नागपूर : ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती

Share This News

नागपूर : कोरोना संसर्ग उपचार पद्धतीमध्ये बाधितांना मोठ्या प्रमाणात द्रव व ऑक्सिजनची गरज असून त्याचा सुरळीत, सुलभ व सहज पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशासन, आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी द्रव ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जगदंबा एअर प्रोडक्शन, विदर्भ एअर प्रोडक्शन या दोन कंपन्यांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदू उईके हे काम पाहतील. तर ऑयनॉक्स एअर प्रोडक्शन प्रा. लिमिटेड बुटीबोरी, ॲमोहॉक्सी इंडस्ट्रीज हिंगणा या दोन कंपन्यांची तपासणी वनपरिक्षेत्र अधिकारी कांतेश्वर बोलके करतील असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व प्रसारामुळे वैद्यकीय क्षेत्रात जीवीतहानी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदीरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच इतर कोविडवर उपचार करणारे खासगी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्ण भरती होत आहे. रूग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे. तो पुरवठा कमालक्षमतेने सुरू राहण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.