नागपुरातील ‘त्या’ खुनाचा पर्दाफाश; पाचव्या पत्नीने केले कृत्य Nagpur exposes ‘that’ murder; The act committed by the fifth wife

Share This News

नागपूर : गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण मलिक यांच्या गळा कापून झालेल्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मलिक यांच्या पाचव्या पत्नीने त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मलिक यांचे हात खुर्चीला बांधत त्यांचा गळा कापण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वाती नावाच्या महिलेला अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकुल येथील फ्लॅटमध्ये रहात होते. ८ मार्चला सायंकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वाती त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने इंटरनेटवर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओ लक्ष्मण यांना दाखविले. त्यानंतर त्याचे हात खुर्चीला बांधले. सोबत आणलेल्या धारधार चाकूने स्वातीने मलिक यांचा गळा कापला व त्यानंतर पलायन केले.


दुसऱ्या दिवशी ९ मार्चला लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे झालेत. लक्ष्मण यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे पोलिसांना आढळले. मलिक यांनी पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलाविले. त्यापैकी पाचवी पत्नी स्वातीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कडक चौकशी केली. तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली. लक्ष्मण मलिक यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नीला मलिककडून आठ वर्षांचा मुलगा आहे. त्या महिलेकडे आणखी एक तीन महिन्यांचे बाळ असल्याने या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार ते बाळ तिने नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते. लक्ष्मणला मात्र स्वातीचे इतर पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय होता. लक्ष्मण सेवानिवृत्त होते. त्यामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून स्वातीने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याचा खुलासा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.