अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, महिलेला अटक
Nagpur Husband Second Wife Set On Fire Woman Arrested
सविता विनोद सव्वालाखे (वय ३९, रा. शांतीनगर) असे अटकेतील पहिल्या पत्नीचे, तर मौसमी शेखर झोडे (वय ३२, रा. कांजी हाउस चौक) असे दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद सव्वालाखे यांचा भांडी घासायच्या पावडरचा व्यवसाय आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांचे सवितासोबत लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये आहेत. दरम्यान, मौसमी ही विनोद यांच्याकडे कामाला लागली. तिला दोन अपत्ये आहेत. विनोदच्या कंपनीत काम करीत असल्याने मौसमी व विनोदमध्ये सतत संपर्क यायला लागला. तिच्या पतीच्या निधनानंतर विनोदने मौसमीला वेळोवेळी मदत केली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.
१९ मार्च २०२० रोजी विनोद यांनी पहिल्या पत्नीला न कळवता मौसमीशी लग्न केले. पती सतत बाहेर राहात असल्याने सविता यांना संशय आला. त्यांनी विनोद यांना विचारणा केली. आता काम वाढले असल्याचे विनोद यांनी सांगितले. दरम्यान, विनोद यांनी मौसमीसोबत दुसरे लग्न केल्याचे सविता यांना कळले. त्यामुळे दोघांत वाद व्हायला लागले. सविता यांनी शांतीनगर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सविता, विनोद व मौसमीला ठाण्यात बोलाविले. प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण मिटले नाही. त्यामुळे शांतीनगर पोलिसांनी हे प्रकरण व्हीएनआयटीसमोरील गुन्हेशाखेच्या भरोसा सेलमध्ये वर्ग केले. शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सविता व विनोद भरोसा सेल कार्यालयासमोरील बाकडावर बसले होते. समुपदेशनानंतर मौसमीही कार्यालयातून बाहेर आली. याचवेळी सविता या मौसमी यांच्या दिशेने धावल्या. बाटलीमधील पेट्रोल मौसमींच्या अंगावर ओतले. माचिसमधून काडी काढली. आग लावत असतानाच मौसमी यांनी आरडाओरड केली. पोलिस धावले. त्यांनी सविता यांला पकडले. प्र्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी सविता व मौसमी यांना ठाण्यात आणले.
पोलिस ठाण्यातही गोंधळ
संतापलेल्या सविता यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यातही गोंधळ घातला. ‘मौसमीला सोडणार नाही’, अशी धमकी त्यांनी दिली. पोलिसांनी मौसमींच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करीत सविता यांना अटक केली.