नागपूर कोविड 19 समिति गठित

Share This News

नागपूर
कोरोनाचा लढा देण्यास सर्वसमावेशक धोरण निश्‍चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकूण १२ सदस्यांची नागपूर कोविड-१९ समिती गठीत केली आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये एक अध्यक्ष, एक सचिव यासह दहा सदस्य अशा एकूण बारा जणांचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.न्यायालयाने या नवीन समितीला बुधवारी सायंकाळी ५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीने बैठक घेण्याचे आदेशही देण्यात आले होते. या बैठकीमध्ये उपराजधानीतील सध्याची कोरोनाची परिस्थिती, त्यावर उपाययोजना, सर्वसमावेशक धोरण, भविष्यातील स्थितीचा अंदाज, खासगी व शासकीय रुग्णालयातील व्यवस्था आदी विषयांवर चर्चा करून योजना तयार करायची आहे. शिवाय समितीला मनुष्यबळाची कमतरता भासल्यास त्यांनी एम्सकडून वैद्यकीय कर्मचारी मागवावे, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. यावर गुरुवारी (ता. ८) दुपारी २.३0 वाजता न्यायमूर्ती परिषद सभागृह येथे प्रत्यक्ष सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे. न्यायालयीन मित्र म्हणून अँड. श्रीरंग भांडारकर, असिस्टंट सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, वरिष्ठ विधिज्ञ एम. जी. भांगडे व अँड.डी. पी. ठाकरे, अँड. सुधीर पुराणिक यांनी याप्रकरणी कामकाज पाहिले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.