नागपूर : महाकृषी ऊर्जा पर्वाची सुरवात Nagpur: Mahakrishi Urja Parva begins

Share This News

नागपूर,03 मार्च : महावितरणतर्फे महाऊर्जा कृषिपंप धोरणाच्या प्रसारासाठी 1 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान ‘कृषी ऊर्जा पर्व’ राबविण्यात येत आहे. यानिमित्त नागपूर परिक्षेत्रात ऊर्जापर्वाचा जिल्ह्यातील वडोदा गावात शुभारंभ करण्यात आला. यावेळी थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार,शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी आणि ऊर्जा धोरणाबाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. या प्रसंगी एक गाव एक दिवस या अभियानातंर्गत गावातील विजेच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील मौदा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या वडोदा येथे आयोजित ऊर्जा पर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी होते. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून योजनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनीही यावेळी महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती दिली. कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, सरपंचा इंगोले, माजी सरपंच ज्ञानेश्वर आकरे इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महावितरणच्या वतीने शिवाजी चोकातून बैलबंडीने मिरवणूक काढून गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी महाकृषी ऊर्जा धोरणात सहभागी होऊन थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या प्रेमकुमार संदी, सुभद्राबाई चिचखेडे,पी.एम.ठाकरे,आर. एम.रेडे, श्रीराम खराबे,बापूराव बोबडे,शामराव वानखेडे या शेतकऱ्यांचा थकबाकीमुक्त प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 37 शेतकऱ्यांनी तब्बल 5 लाख 62 हजार रुपयांचा भरणा केला. भैयालाल नाईक, शोककुमार बिजेवार आणि अरविंद इटनकर या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप साठी डिमांड नोट प्रदान करण्यात आली.तसेच सौर कृषी प्रकल्पाकरिता महावितरणला जमीन दिल्याबद्दल भामेवाडा ग्रामपंचायतचे सदस्य राऊत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मौदा येथील शेतकरी डॉ. पाशू खान यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची कृषी पंपाची थकबाकी एकरकमी भरली. त्यानिमित्त नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.