नागपुरात आता मनपाच्या बस करणार रुग्णवाहिकेचे काम

Share This News

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिका अपुऱ्या पडू लागल्या आहेत. खासगी रुग्णवाहिकांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनपाच्या वतीने बसचे रुपांतर रुग्णवाहिकेमध्ये करण्यात आले आहे. आता नागपुरात बस रुग्णवाहिकेचे काम करणार आहेत.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळणे देखील कठीण झाले आहे. याचाच फायदा घेऊन रुग्णवाहिकेचे दर वाढवण्यात आले आहेत, 2 ते 3 हजारांपासून 10 ते 15 हजांरापर्यंत गरजू कुटुंबांकडून पैसे घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मनपाने महापालिकेच्या बसेसचा रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे. लॉकाडऊनमुळे सर्व ठप्प आहे, शहरातील वाहतूक देखील बंद आहे, त्याच बरोबर या बसेसला रुग्णवाहिका असे नाव दिल्यास आपतकालीन स्थितीमध्ये रुग्णांची वाहतूक करता येते, त्याला दुसरी कोणत्या अन्य परवानगीची गरज नसल्यामुळे या बसेसचा उपयोग आता रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे.
आपली बसमध्ये आसन व्यवस्था असल्याने ती काढून, बेड तयार करण्यात आले आहेत. रुग्णाला रुग्णालयात आणेपर्यंत ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये पंखा आणि आग प्रतिबंधक यंत्रणेची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कात येऊन चालकाला कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी चालकाची बाजू पूर्ण पॅक करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये सीसीटीव्ही देखील लावण्यात आले आहेत.
मनपाकडून अशाप्रकारे 25 बसची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक झोनमध्ये दोन बस अशा एकूण 20 बस धावणार आहेत. तर उर्वरीत 5 बस या अत्यावश्यक गरज पडल्यास मनपाच्या सिव्हिल लाईन कार्यालयात असणार आहेत. दरम्यान या बस सेवेसाठी एक टोल फ्री नंबर देखील देण्यात आला असून, बससाठी त्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. या बसचे तीन शिफ्टमध्ये काम चालणार असून, 24 तास सेवा पुरवण्यात येणार आहे. दरम्यान या मूळे लूटीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. हा प्रकार शवाहिकेच्या बाबतीत सुद्धा पुढे आला आहे. यामुळे 16 बसेसला शव वाहिकेत रुपांतरित करण्यात आले आहे, यामुळे नागरिकांच्या लुटीला आळा बसण्यात मनपाला यश आले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.