नागपूर : आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी सायकलने गाठले मनपा कार्यालय

Share This News

माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘हरित शपथ’

नागपूर, ता. १ : पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी आज शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकलने कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाच्या अनुषंगाने मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकलने मनपा कार्यालय गाठले. कार्यालयात पोहचल्यानंतर आयुक्तांनी सर्वांना ‘हरित शपथ’ देत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज त्यांच्या ‘तपस्या’ या शासकीय निवासस्थानापासून मनपा मुख्यालयापर्यंतचा प्रवास सायकलने केला. मनपा मुख्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी आकाशवाणी चौकात एकत्र आले. तेथून सर्वांनी मनपा मुख्यालयापर्यंत सायकलने प्रवास केला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही स्वत:च्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंतचा नऊ कि.मी.चा प्रवास सायकलने केला. ‘माझी वसुंधरा’ अभियानानिमित्त आज आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, आरोग्याधिकारी तथा उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त विजय हुमणे, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक शील घुले, राहुल पांडे, प्रणिता उमरेडकर, झोन नं. २ मधील सफाई कामगार सायकलपटू दिलीप भरत मलिक यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे आणि एनएसएससीडीसीएलचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या सायकलवर ‘वसुंधरा अभियाना’चा संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

आयुक्तांनी दिली ‘हरित शपथ’
ह्या वसुंधरेवरील पर्यावरणाचे संरक्षण ही माझी आणि प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी मी कटिबद्ध आहे. या वसुंधरेचे मी रक्षण करीन, अशी शपथ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सायकलने कार्यालयात पोहचलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली.झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही सायकल प्रवास
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व झोन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारीही शुक्रवारी सायकलने कार्यालयात पोहचले आणि त्यांनी हरित शपथ घेतली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.