नागपूर : अद्यापही पालकांमध्ये आहे कोरोनाची धास्ती

Share This News

१0 महिन्यापासून बंद असलेल्या शाळा जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबरपासून सुरू केल्या. पहिल्याच दिवशी १६१९८ विद्यार्थी अध्यापनासाठी शाळेत पोहचले होते. पहिल्या दिवशी शाळेची झालेली यशस्वी सुरुवात लक्षात घेता, त्याचा परिणाम दुसर्‍याच दिवशी दिसून आला जवळपास ४ हजार विद्यार्थ्यांनी दुसर्‍या दिवशी घरी न थांबता शाळेत येण्याला पसंती दर्शविली. यानंतर तरी विद्यार्थी उपस्थिती वाढेल अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, अद्यापही पालकांच्या मनातली कोरोनाची धास्ती निघाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटल्यानंतरही एकूण विद्यार्थी उपस्थिती ही केवळ २७.४४ टक्के म्हणजेच ३५,३0६ इतकीच आहे.
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६४८ शाळा गेल्या १४ डिसेंबर रोजी सुरू झाल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाययोजना शाळा व जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. शाळेने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे हळूहळू पालकांची आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याला पसंती दर्शविली, असे पूर्वी दिसून आले. जिल्ह्यात ९ ते १२ वर्गाचे १२८६८९ विद्यार्थी आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्याच दोन दिवसात विद्यार्थ्यांची संख्या ४ हजाराने वाढली होती. शिक्षण विभाग व शाळांच्या नियोजनामुळे लवकरच बहुतांश विद्यार्थी शाळेत परततील, असा विश्‍वास शिक्षण अधिकार्‍यांनी व्यक्त केला होता. परंतु आज शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस लोटले आहेत. त्यानंतरही शाळांमध्ये एकूण विद्यार्थी पटसंख्येच्या केवळ २७.४४ टक्के म्हणजेच ३५,३0६ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती आहे. तर आजवर ६५ वर शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे शिक्षण विभागाकडून प्राप्त शाळा भेट अहवालातून दिसून येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.