परराज्यातून लहान मुलांना पळवून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; नागपूर पोलिसांची कारवाई

Share This News

नागपूर पोलिसांनी परराज्यातून लहान मुलांना पळवून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी निपुत्रिक दम्पत्यांना या मुलांची विक्री करत होती.

नागपूर : परराज्यातून लहान मुलांना पळवून किंवा गरीब पालकांकडून मुलांची खरेदी करून त्यांना लाखो रुपयांच्या किमतीत महाराष्ट्रात विकणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. प्रामुख्याने महिलांचा समावेश असलेल्या या टोळी कडून एका साडे तीन वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली असून याच टोळीने काही दिवसांपूर्वी नागपुरात एक लहान मुलगा साडे तीन लाखात विकल्याची कबुली दिली आहे. मुलं खरेदी करण्यासाठी या टोळीचे नेटवर्क मध्यप्रदेश, छत्तीसगड सारख्या शेजारील राज्यात पसरलेले होते. तर निपुत्रिक दाम्पत्याना मुलं विकण्यासाठी या टोळीने महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना लक्ष केलं होतं. या टोळीला वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी मदत करत असावी असा दाट संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

महिलांचा समावेश असलेली ही टोळी भुरट्या चोरांची नाही, तर ही लहान मुलांना चोरून किंवा स्वस्तात खरेदी करून महाराष्ट्रात विकणारी अत्यंत चालाख टोळी आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना माहिती मिळाली होती की, महिलांच्या एका टोळीकडे एक लहान मुलगी असून ते तिला विकण्याच्या तयारीत आहेत. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या टोळीला अडकवण्यासाठी गांधी बाग परिसरात सापळा रचला. पोलिसांनी स्वतःला निपुत्रिक दाम्पत्य असल्याचं भासवत टोळीची मुखिया शर्मिला खालसे सोबत बोलणी सुरु केली. अडीच लाख रुपयांत मुलीची विक्री करण्याचा व्यवहार झाला आणि पोलिसांच्या पथकाने शर्मिला आणि तिच्या सहा साथीदारांना बेड्या ठोकल्या.

पोलीस तपासात शर्मिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी एक लहान बाळ साडे तीन लाखांत एका निपुत्रिक दाम्पत्यांना विकल्याचं टोळीने कबूल केलं आहे. परराज्यातून लहान मुलांचे अपहरण करणं किंवा त्यांच्या गरीब पालकांकडून स्वस्तात खरेदी करणं आणि महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे सारख्या क्षेत्रात निपुत्रिक दम्पत्यांना त्यांची विक्री करणं अशी या टोळीची कार्यपद्धती होती. ही टोळी अडीच लाखात मुलगी तर साडे तीन लाखांत मुलांची विक्री करायची.

आंतरराज्य पद्धतीने कार्य करणाऱ्या या टोळीला त्या-त्या राज्यांतील काही गुन्हेगार मुलं पळवण्यासाठी मदत करत असावे असा संशय पोलिसांना आहे. तसेच या टोळीने श्रीमंत मात्र निपुत्रिक दाम्पत्याना शोधण्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या शहरात खास नेटवर्क उभारल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, लहान मुलांच्या अधिकारांसाठी कार्य करणाऱ्या जाणकारांच्या मते, मुलांची अशी विक्री अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा शिवाय अपहरण झालेल्या लहान मुलांना फक्त या टोळीच्या तावडीतून सोडविणं एवढंच पुरेसे नसून या मुलांना त्यांच्या आई वडिलांना सोपवेपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करावा अशी मागणी महिला व बाल हक्क तज्ज्ञांनी केली आहे. निपुत्रिक दाम्पत्यांनी ही मुलं दत्तक घेण्यासाठी जी कायदेशीर पद्धत आहे त्याचं पालन करावं, अशा गुन्हेगारांच्या नादी लागून लहान मुलांचे भवितव्य बिघडवू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुलं विकणारी ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. सध्या नागपूर पोलिसांचे एक पथक सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करत असून या टोळीचे इतर सदस्यांचा शोध घेत आहे. तसेच पीडित बालकांच्या कुटुंबियांना शोधण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा खरा स्वरूप समोर येऊ शकणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.