नागपूर पोलिसांनी ४४ वर्षांनंतर पकडला फरार घरफोड्या Nagpur police nab absconding burglars after 44 years

Share This News

नागपूर : घरफोडीच्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला ४४ वर्षांनंतर अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली. लक्ष्मण श्याम बोबडे (वय ६२, रा. आवारी चौक, वकीलपेठ) हे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १९७७मध्ये लक्ष्मण व त्याच्या साथीदारांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लक्ष्मण व त्याच्या साथीदाराला अटकही करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट काढला. तेव्हापासून पोलिस लक्ष्मणचा शोध घेत होते. मात्र तो सातत्याने फरार होत होता. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास चोबीतकर, सुजित देव्हारे यांनी त्याचा शोध सुरू केला. माहितीच्या आधारे लक्ष्मणचा माग काढत अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला अंबाझरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. उपनिरीक्षक चोबीतकर यांना गेल्या एक महिन्यात पाच फरार आरोपींना पकडण्यात यश आल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.