सरन्यायाधीश शरद बोबडे यांना विद्यापीठातर्फे ‘एलएलडी मानद पदवी प्रदान Nagpur University; The Chief Justice will be conferred the honorary degree of LLD
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ (डॉक्टर ऑफ लॉ) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याचा मानस कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बोलून दाखविला. मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान कुलगुरूंनी ही माहिती दिली. सरन्यायाधीश बोबडे यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठातच झाले. त्यांच्यामुळे नागपूर व विदर्भाची मान उंचावली गेली आहे. विधी क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता, त्यांना मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून ३ एप्रिल ही तारीख देण्यात आली असून, त्याच दिवशी विशेष दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येईल. सरन्यायाधीशांचे पद लक्षात घेता, त्यादृष्टीने मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपतींनाच बोलविणे संयुक्तिक ठरेल. त्यामुळे त्यांना निमंत्रण पाठविण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेतदेखील यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राज्यपालांकडूनदेखील याला मंजुरी मिळाली आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित करणार, असा कुलगुरूंना प्रश्न केला असता त्यांनी यासंदर्भात विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. सरन्यायाधीशांच्या पदाचे महत्त्व व उंची लक्षात घेता, त्याच उंचीची व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून बोलविणे योग्य ठरेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमंत्रण देण्याचा विचार असून लवकरच यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.