चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ
नागपूर : चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वस्त्यांची माहिती घेतली असता नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन हॉटस्पॉट ठरल्याचे सामोर आले. याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दुजोरा दिल्याने गंभीरता वाढली आहे. शुक्रवारी ३१९ नवे रुग्ण व ४ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १३७८१४, तर मृतांची संख्या ४२१९ झाली. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद मनपाच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये झाली होती. मोमीनपुरा, तकीया, भानखेडा, टिमकी, हंसापुरी, कसाबपुरा, नाईक तलाव, बांग्लादेश व सतरंजीपुरा आदी वसाहती हॉटस्पॉट ठरल्या होत्या. ऑगस्ट महिन्यापासून तर नागपूरच्या सर्वच वसाहतींमधून रुग्ण आढळून येत असल्याने ‘हॉटस्पॉट’ मागे पडले. आता पुन्हा याची चर्चा होत आहे. मनपा प्रशासनानुसार खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बीडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात मागील सात दिवसांत रुग्ण वाढले. येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहे. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊन गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, तर शुक्रवारी हॉटेल व्यावसायिक व व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरतेने पालन करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.