नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई :महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड यामुळे आता जवळपास निश्चित मानली जात आहे. असे असले तरीही नाना पाटोले यांच्या महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा झाली नाहीय. नाना पाटोळे हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक जिंकले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नाना पटोले यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाची धुरा आली. विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी ती यशस्वीरीत्या सांभाळली. विधानसभा सत्र सुरु होण्यापूर्वी संविधान वाचनाचा उपक्रम त्यांनी सुरु केला. तसेच नाना पटोले यांनी अनेक महतवाच्या सूचना व दिशानिर्देश जारी केले होते. ईव्हीएम सोबतच मतपत्रिकेवर निवडणूक घेता यावी यासाठी कायदा तयार करण्याचे त्यांनी दिलेले निर्देश त्यापैकीच एक आहे. साकोली येथून आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी नाना पाटोले यांनी नागपुरातून भाजपचे हेवीवेट नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती ज्यात नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा पराभव केला होता.