काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांचं नाव जवळपास निश्चित
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निवडप्रकरणी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची दिल्लीत शनिवारी एक बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार बोलून दाखवल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरु केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राजीव सातव, ऊर्जामंत्री नितीन राऊत,पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यापैकी एका काँग्रेस नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. शनिवारी दिल्लीत होत असलेल्या बैठकीत बाळासाहेब थोरात,नाना पटोले,विजय वडेट्टीवार,अशोक चव्हाण उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांनी शनिवारी ही बैठक बोलावली असून राज्यातील नेत्यांशी वन टू वन चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीसोबतच शेतकरी आंदोलनावरही राज्यातील काँग्रेस नेत्यांची मतं जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी काँग्रेसने राज्यातील संघटनात्मक बदल करून महिला काँग्रेस अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे व मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केली आहे