‘आपली बस’ वेगात; ९० रस्त्यांवर
Napurkar Getting Relief After 90 Aapli Buses Running On Road
सात महिन्यानंतर ‘आपली बस’ सोमवार, २ नोव्हेंबरपासून बऱ्यापैकी वेगात आली. एकूण ९० बस रस्त्यांवर धावू लागल्याने नागपूरकर प्रवाशांना दिलासा मिळाला. हिंगणा व बुटीबोरी या औद्योगिक वसाहत असलेल्या परिसरात अधिकाधिक बस सोडल्या जात होत्या.
सात महिन्यानंतर आपली बस सोमवार, २ नोव्हेंबरपासून बऱ्यापैकी वेगात आली. एकूण ९० बस रस्त्यांवर धावू लागल्याने नागपूरकर प्रवाशांना दिलासा मिळाला. हिंगणा व बुटीबोरी या औद्योगिक वसाहत असलेल्या परिसरात अधिकाधिक बस सोडल्या जात होत्या. कामठी मार्गातून तोटा असल्याने हा मार्ग अद्यापही सुरू करण्यात आला नाही.
पहिल्या टप्प्यात बुधवारपासून ‘आपली बस’ सुरू झाली. या टप्प्यात २५ बस रस्त्यांवर आल्या. जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून यात वाढ करून ९० बस रस्त्यांवर काढण्यात आल्या. यातून किमान दीडशेवर फेऱ्या सुरू झाल्या. या फेऱ्यांची संख्या आगामी काळात वाढणार असून, टप्प्याटप्प्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडयापर्यंत संपूर्ण क्षमतेने बस सुरू होतील.
हिंगणा, बुटीबोरी हे दोन भाग औद्योगिक वसाहत असल्याने या मार्गावर सर्वाधिक मागणी व प्रवासी होते. त्यामुळे या दोन मार्गांवर १३ आणि १० बस चालविण्यात आल्या. यासोबतच पिपळा फाटा ते हजारीपहाड या मार्गावरील फेऱ्यातही वाढ करण्यात आली. या मार्गावर शहरातील बहुतांश मोठ्या स्थानकात बस जात असल्याने या मार्गाला प्राधान्य देण्यात आले. पारडी जयताळा ही महालमार्गे, खरबी जयताळा, बर्डी-खापरखेडा, बेसा-गोरेवाडा, बर्डी-पारडी, बर्डी-डिफेंन्स, बर्डी-नागसेनवन/यशोधरा, बर्डी- गोधनी आणि बर्डी-शेषनगर या मार्गांवरही बऱ्यापैकी फेऱ्या देण्यात आल्या. पहिल्या चार दिवसांत केवळ चार ते पाच हजार प्रवाशांनीच प्रवास केला. आता वाढीव फेऱ्यांमुळे प्रवाशांची संख्याही वाढत आहे. सोमवारी किमान २५ हजारांवर प्रवाशांनी विविध मार्गांनी प्रवास केल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे. कामठी मार्गावरही प्रवासी संख्या मोठी आहे. मात्र, हा मार्ग तोट्याचा असल्याने तूर्तास या मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आली नाही. प्रवाशांची मागणी वाढल्यानंतर या मार्गावरही बसफेरी सुरू करण्यात येणार आहे.
अशा धावल्या…
स्टॅण्डर्ड : ४५
मिडी : ३९
मिनी : १६
येथून सुटल्या…
ऑरेंज सिटी डेपो : ३०
पटवर्धन डेपो : ३०
खापरी डेपो : १६
कोराडी डेपो : १४