‘नासा’च्या रोव्हरची मंगळावर पहिली सफर|NASA’s first rover to Mars

Share This News

वॉशिंग्टन : नासाच्या परसिव्हिरन्स या बग्गीसारख्या गाडीने मंगळाच्या पृष्ठभागावर पहिला फेरफटका पूर्ण केला असून एकूण ६.५ मीटर अंतर या गाडीने कापले. विज्ञान प्रयोग सुरू करण्यापूर्वी गाडीने हे अंतर कापले आहे. ही गाडी किमान ३३ मिनिटे सफरीवर होती.

पहिले चार मीटर अंतर ही गाडी सरळ गेली, नंतर डावीकडे १५0 अंश कोनातून वळली व २.५ मीटर अंतर कापून परत आली. सध्या ती एका तात्पुरत्या उभ्या राहण्याचा ठिकाणी आली आहे. नासाने म्हटले आहे, की या गाडीची ही चाचणी सफर होती. त्यात प्रत्येक उपप्रणालीचे कार्यान्वयन व उपकरणे तपासण्यात आली. विज्ञान प्रयोगांसाठी ही सफर हा एक प्राथमिक प्रयोग होता. या प्राथमिक फेरफटक्याचे वेगळे महत्त्व होते, असे संचालन अभियंता अनैस झारीफन यांनी सांगितले.

परसिव्हिरन्स रोव्हर गाडी ही नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केली असून या गाडीला एकूण सहा चाके आहेत. गाडी व्यवस्थित चालू आहे हे आता स्पष्ट झाल्याने वैज्ञानिकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पुढील दोन वर्षे ही गाडी काम करू शकते. वैज्ञानिक उद्दिष्टे पूर्ण करताना रोव्हर गाडी २00 मीटरचे अंतर कापू शकेल. या गाडीच्या मदतीने भूगर्भशास्त्र व हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यातून मंगळ मानवी वसाहतीस योग्य आहे का याचा शोध घेतला जाणार आहे. मंगळावरील माती व खडक गोळा करण्यात येणार आहेत. १८ फेब्रुवारीला गाडीच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या होत्या. सॉफ्टवेअरही अद्ययावत केले होते.

अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळावर उतरविलेल्या या रोव्हरचा उद्देश या ठिकाणी जीवनाच्या शक्यता तपासणे हा आहे. नासाचे हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर नमुने गोळा करीत आहे. कॅलिफोर्नियातील अंतराळ संस्थेच्या जेट प्रोपल्शन लॅबमधील संशोधकांना या मिशनमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागत आहे. याआधी दोन अन्य अंतराळ यान मंगळावर पोहचलेली आहेत. यात संयुक्त अरब अमीरातच्या यानाचा आणि चीनच्या अंतराळ यानाचा समावेश आहे. या तिन्ही मोहिमा मागील वर्षी कोरोना काळात जुलै महिन्यात लाँच करण्यात आल्या होत्या. हा काळ मंगळ मोहिमेसाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण हा काळ मंगळ ग्रहावरील मोहिमेसाठी सर्वाधिक अनुकुल मानला जातो. या अंतराळ यानांनी मंगळावर पोहचण्यासाठी मागील सात महिन्यांमध्ये जवळपास तीनशे मिलियन मैलाचं अंतर पार केले.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.