गेल्या २४ तासात २० हजार नवे कोरोनाग्रस्त आढळले
नवी दिल्ली, २८ डिसेंबर : देशात मागील २४ तासांमध्ये देशभरात २० हजार २१ नवे करोनाबाधित आढळले, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय २१ हजार १३१ जण करोनामुक्त झाल्याचे देखील समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख ७ हजार ८७१ वर पोहचली आहे. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २ लाख ७७ हजार ३०१ असून, ९७ लाख ८२ हजार ६६९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे देशभरात १ लाख ४७ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर २७ डिसेंबरपर्यंत देशभरात १६ कोटी ८८ लाख १८ हजार ५४ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ७ लाख १५ हजार ३९७ नमुने काल तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे. ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांची करोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. करोना प्रतिबंध लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिके(ड्राय रन) दोन जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.