शुक्रवारी व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटीसाठी घोषित केलेल्या तरतुदींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जीएसटीच्या करस्तरांचे पुनरावलोकन सरकारने करावे, या मागणीसाठी देशातील सर्व व्यापारी शुक्रवार, २६ फेब्रुवारीला देशातील बाजारपेठा बंद करणार ठेवणार आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) या भारत बंदची हाक दिली आहे.
जीएसटीच्या तरतुदींचा निषेध करण्यासाठी देशात १,५०० ठिकाणी धरणे आंदोलन २६ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. जीएसटीच्या जाचक तरतुदींना केंद्र व राज्य सरकारांनी स्थगिती द्यावी, जीएसटीच्या संपूर्ण प्रक्रियेचे तसेच करस्तरांचे पुनरावलोकन करावे, व्यापाऱ्यांना जीएसटीची पूर्तता सहजपणे करता यावी यासाठी प्रक्रिया सुलभ करावी या व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
पत्रकार परिषदेत कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, कॅट समवेत ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनदेखील या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहे. देशातील ४० हजार व्यापारी संघटनांचाही पाठिंबा बंदला आहे. जीएसटी कायद्यात आतापर्यंत सुमारे ९५० सुधारणा केल्या गेल्या आहेत. मात्र यामुळे व्यापाऱ्यांसाठी प्रक्रिया सुलभ न होता अधिक जटील होत आहे. त्यामुळेच हा बंद पुकारण्यात आला आहे.