सगळे पैलवान उभ्याने लोळवले; राष्ट्रवादीने जागवल्या ‘त्या’ सभेच्या आठवणी Ncp Celebrates Sharad Pawars Satara Rally, Taunts Bjp

Share This News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेला आज वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं राष्ट्रवादीने एक व्हिडिओ शेअर करत भाजपला टोला हाणला आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेला आज वर्ष पूर्ण झाले. राज्यात सत्ताबदल करण्याइतपत वातावरण बदलणाऱ्या या सभेच्या आठवणी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोशल मीडियावर जागवल्या आहेत. त्या आठवणी जागवताना भारतीय जनता पक्षालाही टोलेही हाणले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाटत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडणार असं बोललं जात होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेते, आमदार, खासदार पक्ष सोडून गेल्यानं या चर्चेला बळ मिळालं होतं. मात्र, १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सातारा येथे शरद पवार यांची सभा झाली आणि सगळे चित्रच पालटले. भर पावसात शरद पवारांनी घेतलेल्या या सभेने निवडणुकीचा माहोल बदलून टाकला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. एकट्याच्या जोरावर बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंगले. त्यातून शिवसेनेला भाजपशी संघर्ष करण्याचे बळ मिळाले आणि राज्यात महाविकास आघाडीचे नवे समीकरण उदयास आले.

हा संपूर्ण इतिहास पवारांच्या त्या सभेनं घडवला होता. आजच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं एक ट्वीट करून त्या सभेच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण पैलवानच समोर दिसत नाहीत, अशी दर्पोक्ती केली. ते म्हणाले, शरद पवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला,’ असं ट्वीट पक्षानं केलं आहे. ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली,’ असंही त्यात म्हटलं आहे.ट्वीटसोबत राष्ट्रवादीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ‘रणनीती, आव्हान आणि सगळे पैलवान नुसते उभ्याने लोळवले. दिल्लीला भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही,’ अशी टोलेबाजी व्हिडिओतून करण्यात आली आहे. ‘शरद पवार ऐंशी वर्षांचा योद्धा’, अशा शब्दांत पवारांचा गौरव करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.