राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तसंच वातावरण तयार केलं : सुधीर मुनगंटीवार
“दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आलेलं हिंसक वळण हे केंद्र सरकारचं अपयश नाही. ज्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रवेशासाठी परवानगी देण्याबाबतची भूमिका घेतली त्यांचं हे अपयश आहे. सरकारने या आंदोलनात अतिशय संयमाने भूमिका घेतली. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“दिल्लीत ते पुतना मावशीच्या रुपात आलेले काही षडयंत्रकारी लोकं होते. या लोकांनी षडयंत्र केले. 26 जानेवारीचा दिवस निवडला. दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस आयुक्तांनी वारंवार हे आंदोलन 26 जानेवारीला करु नका, असं आवाहन केलं. मात्र, तरीही आंदोलकांनी ऐकले नाही. याउलट परवानगी दिली नाही तर याद राखा, असा गंभीर इशारा दिला गेला”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“26 जानेवारी आमचा पवित्र राष्ट्रीय सण आहे. या राष्ट्रीय सणात विघ्न टाकण्यात आलं. आता आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. जात, पंथ, धर्माच्या पलीकडे जावून निर्णय घेतला पाहिजे. हा संविधानावर हल्ला आहे. काही लोक हा भाजपचा हल्ला होता, असं आरोप करत आहेत. तर मग ठराव करा. जो कुणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजी”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“मी मोदींना याबाबत पत्र पाठवणार आहे. आपण अनेक गोष्टींना सहन करतो. देशासाठी लाखो सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे संविधानाच्या राष्ट्रीय सणामध्ये विघ्न आणणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. या प्रकरणातील खरे सूत्रधार बेनकाब करुन त्यांना चव्हाट्यावर आणण्याचं काम अतिशय वेगाने केलं पाहिजे”, असं मुनगंटीवार म्हणाले.