नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा
आज देशात तांदूळ मुबलक प्रमाणात आहे. मका मुबलक आहे. यापासून इथेनॉल इंधन निर्मितीला शासनाने परवानगी दिली आहे. आवश्यक इथेनॉलची निर्मिती झाली, तर ही अर्थव्यवस्था दोन लाख कोटींची होईल. रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत मिळेल,असे सांगून गडकरी म्हणाले, देश आणि एमएसएमई प्रगतीकडे, विकासाकडे कशी जाईल, यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.लोकशाही
नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा कायापालट कसा करता येईल आणि अधिक रोजगार निर्मिती कशी होईल? देशाला प्रगतीकडे कसे जाता येईल, याचा विचार केला जावा आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रांनी करावे, असे प्रतिपादन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘गेम’तर्फे आयोजित एमएसएमईच्या आर्थिक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, एमएसएमईची व्याख्या आता बदलली आहे. एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून एमएसएमईने ३0 टक्के जीडीपी ४0 टक्क्यांपर्यंत, ४८ टक्के निर्यात ६0 टक्क्यांपर्यंत आणि पाच कोटी नवीन रोजगार पाच वर्षांत निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होण्यासाठी हे उद्दिष्ट महत्त्वपूर्ण आहे. यामुळे उद्योगांमध्ये वाढ होईल आणि रोजगार निर्मिती अधिक होईल, असेही ते म्हणाले. शहरी भागातील उद्योगांचे विकेंद्रीकरण होऊन ते कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे वळणे आवश्यक असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, येत्या दोन वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्था पाच लाख कोटींची बनविण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या चार बाबीही उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक असून ज्ञानाचे आणि कचर्याचे संपत्तीत रूपांतर करणे ही देशाची गरज आहे. देशात आज मोठय़ा प्रमाणात तांत्रिक केंद्रे आहे. ही केंद्रे अभियांत्रिकी महाविद्यालयांना लीजवर दिली जावी. त्यामुळे या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावू शकतील.