नागपूर फ्लाईंग क्लबची तीन विमाने उड्डाणासाठी नव्याने सज्ज

Share This News

नागपूर : उड्डाण क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांसाठी नागपूर फ्लाईंग क्लब नव्याने सज्ज होत असून नागरी विमान उड्डयण संचालनालय (डीजीसीए) परवानगीने तीन विमानांचे तपासणीपूर्व उड्डाण यशस्वी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.
नागपूर फ्लाईंग क्लबकडे चार विमाने असून त्यापैकी तीन विमाने सेसना 152 श्रेणीतील तर एक विमान 172 श्रेणीतील आहे. यापैकी तीन विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने तीनही विमानांचे आज टेस्ट फ्लाईट यशस्वी पार पडले आहे. उड्डाण यशस्वी झाल्यासंबंधीचा अहवाल नागपूर उड्डाण विभागाच्या महासंचालकांना यांना सादर करण्यात येणार आहे. महासंचालकांच्या मान्यतेनंतरच प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी आज दिली.
विमानतळ परिसरातील नागपूर फ्लाईंग क्लबच्या हँगरमधून विमानतळ धावपट्टीपर्यंत व त्यानंतर या तीनही विमानाने आकाशात झेप घेतली. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ विविध पद्धतीने उपलब्ध करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे डीजीसीएकडून उड्डाण प्रशिक्षण संघटना (एफसीओ) ही मान्यता प्राप्त करुन घेण्यात येईल व त्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबकडे चार विमाने असून यापैकी दोन विमाने क्लबच्या मालकीची आहेत. तसेच नवी दिल्लीच्या एरो क्लब ऑफ इंडिया यांच्याकडून करार तत्त्वावर दोन विमाने घेण्यात आली आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून बंद असलेले वैमानिक प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले आहेत. कोविड-19 च्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असतानाही येणाऱ्या विविध अडचणींवर मात करत विमान प्रशिक्षणाला प्राधान्य देवून नव्याने विमानाचे उड्डाण सुरु करण्यात आले आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबची स्थापना 1947मध्ये झाली असून विदर्भातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या क्लबतर्फे आतापर्यंत बरेच पायलट प्रशिक्षित झाले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअर लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने या क्लबची (नागपूर फ्लाईंग क्लब प्रा. लि.) शासनाच्या मालकाची कंपनी म्हणून 21 डिसेंबर 2006 रोजी नोंदणी केली आहे. या कंपनीचे काम कंपनी ॲक्टनुसार सुरु आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबच्या संचालक मंडळातर्फे प्रारंभी तीन विमानांचे अनिवार्य असलेले पुअर एक्सचेंज व एका विमानाचे स्ट्रीप इन्स्पेक्शन करण्यात आले. चारही विमाने मानकाप्रमाणे करुन घेण्यात येवून एन. डी. टी. तपासणी करण्यात आली. त्यासोबतच हँगरचेसुद्धा नूतनीकरण करण्यात आले. विमानांसाठी अत्यावश्यक असलेले रेडिओ उपकरणांची दुरुस्ती सीएएमओचे नूतनीकरण आदी सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. त्यासोबत एरो क्लब ऑफ इंडियाच्या एरो मोबाईल लायसन्सचे डी – रजिस्ट्रेशन व रजिस्ट्रेशन करणे तसेच विमानांच्या चाचणीसाठी परवानगी घेतल्यानंतरच आज नागपूर फ्लाईंग क्लबचे तीनही विमानाने यशस्वीरित्या आकाशात उड्डाण केले असल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.