एनआयएची कारवाई:12 तास चौकशीनंतर वाझेंना अटक NIA action: Wazen arrested after 12 hours of interrogation

Share This News

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या कारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास वादग्रस्त पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. या प्रकरणात १२ तासांच्या कसून चाैकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार्मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात सचिन वाझे यांची भूमिका आणि सक्रिय सहभागाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी वाझेंविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे सापडले असल्याचे निरीक्षण नोंदवून ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तत्पूर्वी, एनआयएच्या मुंबई कार्यालयात वाझेंनी जबाब नोंदवला. दुसरीकडे, अँटिलिया स्फोटकांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिहार तुरुंगात तेहसीन अख्तरची चौकशी केली.

वाझेंना आज कोर्टापुढे हजर करण्यात येणार
सकाळी ११.३० च्या सुमारास वाझे कंबाला हिल येथील एनआयएच्या कार्यालयात हजर झाले. या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अँटिलिया बंगल्यासमोर २५ फेब्रुवारीला सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयए तपास करीत आहे. त्यानंतर सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. मध्यरात्री वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांना एनआयएच्याच कार्यालयात ठेवण्यात आले. रविवारी सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी पुढील चौकशीसाठी एनआयए त्यांचा काही दिवस रिमांड मागण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने नोंदवलेेले निरीक्षण असे : २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी वाझे आणि मृत मनसुख सोबत होते, शिवाय हिरेन यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये थेट वाझेंवर आरोप केला आहे.तपासाच्या प्राथमिक टप्प्यावर न्यायालयास हे दिसून आले आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.