अँटिलियाबाहेर स्फोटके प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए कडून अखेर अटक NIA arrests Sachin Waze in Antilia blast case

Share This News

मुंबई:मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली. उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर कारमध्ये आढळलेल्या स्फोटके प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने ही कारवाई केली. वाझे यांच्या अटकेमुळे राज्य सरकारची गोची झाली आहे
स्फोटके प्रकरणाचा तपास
एनआयए कडे आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. पेडर रोडवरील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी साडेअकराच्या सुमारास दाखल झाले होते. तब्बल बारा ते तेरा तास चौकशीनंतर रात्री अकरा वाजता वाझे यांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अँटिलियाबाहेर स्फोटकांसह कार पार्क करण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून वाझे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही
कारवाईने राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वाझे यांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांना अटक करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला असून प्रथमदर्शनी हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.