फडणवीस यांच्या टीकेला निलम गोऱ्हे यांनी दिलं उत्तर
औरंगाबादचं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. “औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारलं होतं. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही,” असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे