*दिशाहीन कर्ण नको.. दूरदर्शी अभिमन्यू हवेत ! ज्ञानेश वाकुडकर

Share This News

कर्ण शूर होता, पराक्रमी होता, पाचही पांडवापेक्षा वयानं मोठा होता. कौरवांची संख्याही पांडवापेक्षा एकवीस पट मोठी होती. कर्ण सत्तेच्या बाजूनं होता ! कर्ण कौरवांच्या बाजूनं होता !

पांडव पाचच होते. एकटे होते. शेवटी त्यांच्याकडे राज्यही नव्हतं. सेनाही नव्हती. एक हक्काचं गावही त्यांच्याकडे राहिलं नव्हतं. एक युगंधर कृष्ण मात्र त्यांच्या बाजूनं होता !

कौरव सर्वशक्तिमान होते. त्यांच्याकडे अमर्याद सत्ता होती. सारी गावं त्यांच्या ताब्यात होती. प्रचंड संपत्ती होती. प्रचंड मोठी सेना होती. पांडव तर वनवासी होते. भिकारी होते. याचक होते. निर्धन होते. पण त्यांची बाजू सत्याची होती. न्यायाची होती. आधी त्यांच्या चुका झाल्यात, हे मान्य करायलाच हवं. त्यांना सत्ताधारी कौरवांची चालबाजी ओळखता आली नाही, हा त्यांचा दोष होता. सारं राज्य जुगारावर लावणं, हा मूर्खपणा होता. प्रत्यक्ष द्रोपदीला पणावर लावणं, हा तर धर्मराज आणि इतर पांडवांचाही अक्षम्य अपराध होता. त्यासाठी पांडवांना क्षमा करता येणार नाही..!

पण तरीही दुर्योधन-दु:शासन यांचा हलकटपणा समर्थनीय होऊ शकत नाही. वस्त्रहरण द्रौपदीचं असो की लोकशाहीचं असो, कुठलाही सभ्य माणूस चूप बसू शकत नाही. अशावेळी जो चूप बसेल, तो नीच आहे..! सत्याचा विरोधक आहे..! न्यायाचा मारेकरी आहे.. लोकशाहीचा मारेकरी आहे..! मग तो कर्ण असू द्या, त्याच्या डोक्यावर खुशाल सत्तेची कवच – कुंडलं असू द्या, किंवा आधुनिक लाल दिवा असू द्या.. जे जे कौरवांच्या टोळीत असतील, जे जे अशावेळी माना खाली घालून बसले असतील, ते ते आपल्या हिताचे दुश्मन आहेत, हे आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल..!

कर्ण त्या अर्थानं पांडव होता. म्हणजे कागदोपत्री तो पांडवांच्या वर्गातला होता. त्याच्यावर अन्याय झाला हे मान्य, पण म्हणून त्यानं दुर्जनाच्या टोळीत सामील होणं, मान्य करता येणार नाही. कर्ण आपल्या प्रवर्गातला असो, आपल्या जातीचा असो की थेट आपला नातेवाईक असो, पण कर्ण आपला दुश्मन आहे, हेच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल..! शोषणाच्या कटातील साथीदार होता, सत्तेचा लाभार्थी होता !

अर्थात, कर्णाचं जिंकणं म्हणजे कौरवांचं जिंकणं !  कर्णाचा विजय, म्हणजेच दुर्योधन – दु:शासन यांचा विजय ! हलकटपणाचा विजय.. नीच प्रवृत्तीचा विजय ! जातीपाती मुळे कर्ण तुम्हाला कितीही प्रिय असू द्या, पण त्याच्या विजयासाठी मदत कराल, तर स्वतःच्या विनाशासाठी मदत करत आहात, याचं भान असू द्या ! आपल्या पुढच्या पिढ्यांची कबर खोदण्यासाठी आपण स्वतःच मदत करत आहोत, याची जाणीव ठेवा ! निदान आतातरी शुद्धीवर या !

कोणत्याही प्रस्थापित पक्षातले भीष्म असो, द्रोणाचार्य असो की कर्ण असो, आपल्याला मोठे वाटता कामा नये.. आपले वाटता कामा नये ! कुणीही त्यांच्याबद्दल आदर बाळगता कामा नये ! ओबीसी – बहुजनांनी हे आता कठोरपणे समजून घ्यायला हवं. हे सारे सत्तेसाठी फितूर झालेले लोक आहेत. लाल दिव्यासाठी अख्खा समाज विकून बसलेले लोक आहेत. स्वार्थासाठी समाजाशी, देशाशी बेइमानी करायला तयार असलेले लोक आहेत ! लाचार आहेत ! सत्तेचे गुलाम आहेत ! भरल्या मैफिलीत द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना, हे सारे माना खाली घालून बसले होते, याची आठवण आपण ठेवली पाहिजे ! बावन्न टक्के ओबीसींचं आरक्षण सहा, सात टक्क्यांवर आणलं गेलं, तेव्हा ते तथाकथित ओबीसीचे भीष्म – द्रोण – कर्ण कुठल्या गुत्त्यावर झिंगत पडले होते, याचा हिशेब स्वतः ओबीसी समाजानंच करायला हवा !

कौरवांच्या हातात प्रचंड सत्ता असेल, पांडवांच्या मूर्खपणा मुळे ती गेली असेल, तरी लोकशाहीचं वस्त्रहरण कुणीही मान्य करता कामा नये ! आणि म्हणून स्वार्थासाठी शेपटी टाकून बसणारा एखादा भीष्म असो, द्रोणाचार्य असो की ‘ओबीसी ओबीसी’ करणारे अलीकडचे नौटंकीबाज कर्ण असोत, सारे ओबीसी, बहुजनांचे दुश्मन आहेत.. कारण ते कौरवांच्या टोळीत आहेत. त्यांच्या टोळीचे शिलेदार आहेत. ते तुमचे हितचिंतक असूच शकत नाहीत. कर्ण जिंकला तर तुम्हीच हरणार आहात. ओबीसी समाज हरणार आहे ! कर्णाचा विजय म्हणजेच कौरवांचा विजय आहे ! प्रस्थापितांच्या टोळीत असलेल्या कर्णाचा, भिष्माचा, द्रोणाचा विजय आहे ! तो ओबीसी, बहुजन, बारा बलुतेदार, अल्पसंख्यांक, शोषितांचा पराभव आहे..! त्यांच्या विनाशावरचं  शिक्कामोर्तब आहे..! लोकशाहीच्या हत्येवर शिक्कामोर्तब आहे ! कळत नकळत त्या पापात सहभागी होऊ नका ! उत्साहाच्या भरात आपण कोणकोणत्या चुका करून बसलो आहोत, त्याची आठवण अगदी ताजी आहे !

म्हणून आपल्याला आता गोंधळलेले कर्ण नकोत, नव्या दमाचे दूरदर्शी अभिमन्यू हवेत..जे कुठलाही चक्रव्यूह उध्वस्त करण्याएवढे समर्थ असतील ! ज्ञान, विज्ञान, उद्योग, समाजकारण, राजकारण याची परिपूर्ण जाण असलेले नवे अभिमन्यू आम्हाला हवे आहेत..! आपल्याला ते शोधावे लागतील ! पैलू पाडावे लागतील ! त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ! त्यांना संधी द्यावी लागेल ! आणि लोकजागरनं त्याची सुरुवात केलेली आहे !

मुख्य पांडव आता थकलेले आहेत. त्यांच्या जुन्या चुका, जुनी पापं त्यांना कौरवांशी लढू देत नाहीत. असे लाचार लोक जसे कौरवांच्या टोळीत आहेत, तसेच ते पांडवांच्याही कंपूत आहेत. त्यांना लढाईतून बाजूला करावं लागेल ! नवा पर्याय उभा करावा लागेल ! स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंगाचे वैचारिक उत्तराधिकारी आता नव्या लढाईचे नेते व्हायला हवेत !

तेव्हा दिशाहीन कर्णांच्या नादी लागू नका. लाचार भीष्म, लाचार द्रोण यांच्यावर विसंबून राहू नका ! ते त्यांचे त्यांचे लंगोट सांभाळण्यात व्यस्त आहेत !  आपण नवे अभिमन्यू शोधू या.. नवे भगतसिंग शोधू या.. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू या..!
*शभर युवा, महाराष्ट्र नवा*
हा लोकजागरचा महामंत्र आहे ! तो श्वासामधे, प्राणामधे भरून  ठेवू या !

धोक्याच्या प्रत्येक वळणावरती सूचना देणारा बोर्ड असेलच असं नाही, म्हणून उत्साही ड्रायव्हरच्या भरवशावर विसंबून राहू नका..!

आणि हो..
.. समोर धोक्याचं वळण आहे ! लुटारुंची वस्ती पण याच रस्त्यावर आहे ! तेव्हा..
*जागे रहा ! सजग रहा !! चौकस रहा !!!*


ज्ञानेश वाकुडकर


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.