केवळ दलितांचे नव्हे, सामान्यांचेही कैवारी

Share This News

कोणत्याही एका जातीत जन्माला येणे हे कुणाच्याच हातात नसते. महापुरुषही त्याला अपवाद नसतात. प्रत्येक काळात विविध क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्याएवढे मोठे काम करणारे लोक जन्माला येतात. काही जणांना जिवंतपणी तर काहींच्या वाट्याला ते गेल्यावर थोरवी येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट, हालअपेष्टा आणि थोरपण जिवंतपणीच अनुभवले.
1956 साली बाबासाहेब गेल्यावर नंतरच्या सात-आठ दशकात त्यांनी विविध क्षेत्रात केलेला अभ्यास, प्रयत्न आणि काम हळूहळू समाजापुढे आल्यावर ज्ञान या शब्दाचा पर्याय म्हणून त्यांचे नाव ओळखले जाऊ लागले. आजच्या घडीला जगभरातल्या विद्यापीठात ज्ञानाला पर्याय म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला जातो. हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशासाठी गौरव आहे.

महापुरुष ज्या जातीत जन्म घेतात त्या समूहांना त्यांचा स्वाभिमान, गर्व असणे स्वाभाविक असते, मात्र जगाच्या कल्याणाचा ध्यास जगलेला महापुरुष इतरांनाही नेमका समजला पाहिजे हा प्रयत्न जाती समूहांकडून थांबला की हिमालयाच्या उंचीचे महापुरुष जातीत बंदिस्त होतात.


बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, धार्मिक सुधारणा आणि धर्मचिकित्सा पचनी न पडल्यावर नामवंत लेखक आणि बोरूबहाद्दरांनी त्यांची थोरवी जबरदस्तीने मान्य करून त्यांना दलितांचे कैवारी करून टाकले. हेच पंडित त्याही काळात अभ्यास मंडळावर असल्याने भावी पिढ्यांना अनेक दशके जो इतिहास शिकवला गेला, त्यातून बाबासाहेब हे आपले नव्हे तर दलितांचे कैवारी होते हेच मेंदूत कोरले गेले आहे. कुण्याही थोर व्यक्तीने केलेले काम बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला तर इतर समूह त्यांच्याकडे समजून घेण्याच्या नजरेने बघत नाहीत हे वास्तव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, उपेक्षित वर्गासाठी काम केले यात दुमत नाही, मात्र तेवढे करूनच ते थांबले नाहीत. त्यांनी पहिला लढा पुकारला तोच मुळात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर होता. कोकणातल्या खोतीच्या विरोधात खंडकरी शेतकर्‍यांच्या बाजूने बाबासाहेब उभे राहिले. त्यावेळी हे सगळे खंडकरी शेतकरी कुणबी, पाठारे आणि इतर जातींचे होते. दीर्घकाळ सत्याग्रह चालल्यावर शेतकर्‍यांना न्याय देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. हे आताच्या काळात मराठा, ओबीसी समूहांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे.
पुढे मुंबई विधानसभेवर बाबासाहेब पहिल्यांदा निवडले गेले तेव्हा अर्थसंकल्पावर भाषण करण्याची वेळ आली तेव्हा पहिल्याच भाषणात या महापुरुषाने दलितांचे प्रश्न न मांडता शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे अशी शेतीच्या अर्थव्यवस्थेची उकल करणारा पहिला शेतकरी चिंतक बाबासाहेब आहेत हेच आजच्या शेतकरी समूहांना माहिती नसेल तर बाबासाहेब दलितांचे कैवारी नाही तर काय म्हणून बंदिस्त राहतील याचा विचार करा.


बाबासाहेब या देशाचे पहिले मजूर मंत्री होते, एवढेच आमच्या लक्षात येते, मात्र ते ऊर्जा, कायदे, पाटबंधारे मंत्रीही होते. त्यांनी काम केलेली खाती प्रामुख्याने ओबीसी समूहाशी संबंधित आहेत. देशातल्या धरणांचा पाया घालताना त्यांनी शेती आणि शेतकर्‍यांच्या जगण्याचा जेवढा सूक्ष्म अभ्यास करून धोरणे तयार केली तेवढे आजही कोणाला जमू शकले नाही. बिहारच्या कोळसा खाणीत काम करणार्‍या मजुरांचे जगणे प्रत्यक्ष बघता यावे यासाठी चारशे फूट बोगद्यात जाऊन खाण मजूर, कर्मचार्‍यांच्या यातना बघितल्यावर या देशाचे मजूर, कर्मचारी धोरण तयार झाले. त्याच्या मुळाशी हाच दलितांचा कैवारी असतो, मात्र त्याच्या धोरणाचे लाभार्थी दलित होऊ शकले नाही हे सत्यही आता जगाला सांगायला हवे.
नेहरूंच्या मंत्रिमंडळातून ज्या हिंदू कोड बिलाच्या आग्रहापोटी त्यांना राजीनामा द्यावा लागला ते बिल तमाम मराठा, ओबीसी, ब्राह्मण सगळ्याच स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा सर्वाधिक कुणाला लाभ झाला असेल तर तो मराठा, कुणबी ओबीसी यांना आणि हाच समूह आपल्यासाठी त्यांनी काय केले, अशी गरळ ओकत असेल अशा कपाळ करंट्यांना काळही माफ करणार नाही. आकाशाएवढी उंची लाभलेल्या या महामानवाला अभिवादन…

पुरुषोत्तम आवारे पाटील


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.