सप्टेंबरनंतरच्या थकबाकीसाठी नोटीस; ऊर्जामंत्र्यांची स्पष्टोक्ती
नागपूर : राज्यातील कृषिपंपांच्या वीज थकबाकीचे धोरण यापूर्वीच ठरले आहे. सप्टेंबर २०२० पर्यंतच्या वीज थकबाकीची रक्कम गोठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्याबाबतचे लेखी परिपत्रकही काढण्यात आले आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२०नंतरच्या थकबाकीसाठी ग्राहकांना वीजबिल भरण्याबाबतची नोटीस पाठविण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील थकबाकीदार वीजबिलधारकांचा पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांच्या टीकेला डॉ. राऊत यांनी सोशल माध्यमांवरील एका पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. थकबाकीदार कृषिपंपधारकांची रक्कम सप्टेंबर २०२०मध्ये गोठविण्याचे लेखी परिपत्रक महाविरतणने काढले आहे. त्यानुसार सर्व थकबाकीदारांची रक्कम गोठविण्यात आली आहे. सप्टेंबर २०२०नंतर ज्यांच्याकडे वीजबिलाची थकबाकी आहे, त्यांना पुरवठा खंडीत करण्यासाठी नोटीस बजावविण्यात येत आहे. कोणताही अधिकारी थेट वीजपुरवठा खंडीत करीत नाहिये. आधी थकबाकीदारांना वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी हप्ते पाडून देण्यात येत आहेत. हप्ते भरण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. त्यानंतरही रक्कम न भरणाऱ्या वीजग्राहकांना पुरवठा खंडीत करण्याची नोटीस बजविण्यात येत आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महावितरण सरसकट वीजपुरवठा तोडतेय हा अपप्रचार सुरू असल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.