६० ग्राम एमडी पावडरसह कुख्यात गुंड दिवाकर गुन्हे शाखेच्या अटकेत
नागपूर – कुख्यात गुंड दिवाकर तसेच त्याचा भाऊ आशू ऊर्फ आशिष बबनराव कोतुलवार या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस तसेच ६० ग्रामएमडी पावडरही जप्त करण्यात आली. दिवाकर आणि आशू हे दोघेही हार्डकोअर क्रिमिनल्स असून त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोघे नरेंद्रनगरातील तिरूपती एन्क्लेव्ह नामक ईमारतीत राहत असल्याची आणि त्यांच्याकडे पिस्तूल असून ते कुणाचा तरी गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास या इमारतीत छापा घातला. यावेळी पोलिसांना आशू कोतुलवार हाती लागला. त्यांच्या सदनिकेतून एक पिस्तुल आणि ३ जिवंत काडतूस तसेच ६० ग्राम एमडी पावडर पोलिसांनी जप्त केले.