आता रोज ८ च्या आत घरात, दर रविवारी संचारबंदी
अमरावती शहर व जिल्हयातील कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी पून्हा एकदा लॉकडाउन नियमांचे पालन बंधनकारक झाले आहे. जिल्हयात आता रात्री ८वाजेपर्यंतच सर्व दुकाने व व्यवहार सुरु ठेवता येणार आहे. यासह शनिवारच्या सायंकाळपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत कडक कर्फ्यू लागू झाला असून जिल्हाधिकारी नवाल यांनी गुरुवारी तसे तातडीचे आदेश बजावले आहे. जिल्हयातील सर्वच प्रकारच्या बाजारपेठा, दुकाने यांना दररोज रात्री ८ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली असून नियम मोडणार्यांवर कारवाईसाठी विशेष भरारी पथकांचे गठनही झाले असून सर्व पथकांना तत्काळ सक्रिय कारवाईचे आदेश बजावण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
अमरावती शहर व जिल्हयातील सर्व जलतरण तलाव,इनडोअर गेमवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली असून धार्मिक समारोहात केवळ पाचच नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करीत सहभागी होता येणार आहे. जिवनावश्यक वस्तू भाजीपाला,दूध विक्रीची दुकाने यांनाच सकाळी ६ ते १० पर्यंतची सूट संचारबंदीत देण्यात आली असून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा या संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून सदर नवे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हयात लागू झाले आहेत.
नवा उच्चांक दिवसभरात ५९७ पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू
अमरावती शहर व जिल्हयातील कोरोना विषाणू संक्रमणाचा दररोज एक रेकॉर्ड तूटत असून दररोज नवा उच्चांक नोंदवल्या जातोय. गुरुवारच्या दिवसभरात ५९७ इतक्या नव्या कोरोना बांधीतांची नोंद झाली तर आणखी ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.