आता एटीएस विरुद्ध एनआयए सचिन वाझेचा ताबा कोणाकडे?

Share This News

मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करणार्‍या राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन वाझे याचा ताबा घेण्यासाठी एनआयए कोर्टात अर्ज केला असून येत्या २५ मार्चपर्यंत त्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. सचिन वाझे याचा ताबा मिळाल्यास या गुन्ह्याच्या कटातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल, अशी खात्री एटीएसला आहे. मात्र, मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यामुळे सचिन वाझे याचा ताबा एटीएसला देण्यासाठी एनआयए कोर्टात विरोध करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझेचा ताबा घेण्यावरून येत्या २५ मार्च रोजी एटीएस आणि एनआयएच्या वकिलांमध्ये वाद रंगणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवण्यात आली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे सापडल्याने खळबळ उडाली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणा करत आहेत. त्यापैकी स्फोटकांच्या स्कॉर्पिओचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएस करत आहे. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात एनआयएने सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली आहे. त्यानेच हा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. सचिन वाझे हा २५ मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहे. दरम्यान मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे एटीएसच्या तपासात जवळ जवळ उघड झाले आहे.

सचिन वाझे याचा ताबा मिळाल्यास या कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल, अशी खात्री एटीएसला असून त्याचा ताबा घेण्यासाठी एटीएसने रविवारी ठाणे कोर्टातून ट्रान्सफर वॉरंट मिळवले आहे. त्या आधारे वाझे याचा एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी एटीएसने एनआयए कोर्टात संकीर्ण अर्ज दाखल केला असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी पत्रकाराला दिली आहे. २५ मार्च रोजी सचिन वाझे याची एनआयए कोठडी संपणार असून त्याच दिवशी अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख सिंग यांनी दिली. सचिन वाझे याचा ताबा मिळाल्यास मनसुख हिरेन याच्या हत्येच्या मुळाशी जाऊन या कटातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल आणि संपूर्ण कट उघड करता येईल, अशी खात्री असल्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी म्हटले आहे. मात्र, सचिन वाझे याची एनआयए कोठडी वाढवून मिळवण्यासाठी एनआयए न्यायालयाकडे मागणी करणार असल्यामुळे न्यायालयात एटीएस आणि एनआयएच्या वकिलांमध्ये २५ मार्च रोजी सचिन वाझे याचा ताबा मिळवण्यावरून सामना रंगणार आहे.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदलीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. अनिल देशमुख यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांशी नुकतीच चर्चा केली. त्यांच्या सल्ल्याने आता अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांच्याविरोधात आपली बाजू मांडणार आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.