लंडनच्या ‘त्या’ मैत्रिणीच्या नादात नागपुरातील वृद्धाने गमावले १० लाख..! | Old man in Nagpur lost Rs 10 lakh due to friend from London ..!
लंडनच्या एका कथित मैत्रिणीच्या नादात नागपुरातील एका ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीने तब्बल १० लाख गमावले आहे. कस्टम ड्युटीच्या नावाखाली लंडनच्या या मैत्रिणीने या वृद्धाला १० लाखांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या या वृद्धाची काही महिन्यापूर्वी फेसबुकवर लिंडा थॉमसन नावाच्या एका महिलेशी ओळख झाली होती.आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले. लिंडाने तिचे लंडनमधील फोटो दाखवून नागपुरातील या वृद्धाला भुरळ घातली. लॉकडाउनच्या काळात अचानक एक दिवशी लिंडाने तिच्याकडील कोट्यवधी रुपये भारतात आणून त्या पैश्यातून सेवाकार्य करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ज्याला नागपुरातील या वृद्ध मित्रानेही होकार दिला. अचानक एके दिवशी लिंडाचा पुन्हा फोन आला आणि ती दिल्ली एअरपोर्टवर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याची थाप मारली. तिच्याकडे भारतात सेवाकार्य करण्यासाठी आणलेले २ कोटी रुपये असल्याने १० लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरल्याशिवाय बाहेर निघू देत नसल्याची थाप मारली. सोबतच बनावट कस्टम अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे करून दिले. लंडनच्या या ‘मैत्रीणीच्या’ जाळयात पुरत्या अडकलेल्या या वृद्धाने त्यांच्याकडील ९ लाख ६६ हजार रुपये लिंडाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले. त्यानंतर लिंडा बेपत्ता झाली. अनेक आठवडे वाट पाहूनही लिंडाचा काही ठावठिकाणा लागला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या वृद्धाने बजाजनगर पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. मात्र वृद्धासोबत फोनवरून बोलणारी महिला हि कधीच लंडन मधून बोलत नव्हती तर ती दिल्लीतूनच बोलत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.