शंभर लाख कोटींच्या पायाभूत सुविधा उभारणार
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : होरायसिस आशिया मीट कार्यक्रमात मार्गदर्शन
ग्रामीण भागाच्या विकासावर भर आज कृषी, ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. मागास क्षेत्रात उद्योग नसले तर रोजगार कसा निर्माण होणार? आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेची उलाढाल ही फक्त ८0 हजार कोटींची आहे. ही उलाढाल पाच लाख कोटींपर्यंत गेली तर रोजगार निर्माण होतील व शहराकडे येणारा तरुणांचा लोंढा थांबेल. ग्रामीण व मागास भागातील कच्च्या मालावर आधारित अनेक लहान लहान उद्योग त्या भागात सुरू होऊ शकतात. पण त्यासाठी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था वाढवावी लागेल. उद्योग व नवीन तंत्रज्ञान तेथे न्यावे लागेल. परिणामी मागास व ग्रामीण भागाचा जीडीपी वाढेल, असेही ना.नितीन गडकरी यांनी नमूद केले.लोकशाही वार्ता/नागपूर शंभर लाख कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठ.ी आम्ही कठोर मेहनत करू. पंतप्रधानांनी दिलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. होरायसिस आशिया मीट या कार्यक्रमात सोमवारी ना. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. ना. गडकरी म्हणाले, कोविडचा ताप संपूर्ण जगाला आहे. विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पण सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने ही लढाई जिंकावी लागणार आहे. भारतात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच शासनाचे गुंतवणुकीबाबतचे धोरण योग्य असल्यामुळेच भारतात गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आमचे ऑटोमोबाईल क्षेत्र तर जगात नंबर वन उत्पादन करणारे क्षेत्र ठरणार असून या क्षेत्राची कामगिरी उत्तम आहे. मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती या क्षेत्राने केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्यमशीलता, कौशल्य, संशोधन यालाच ज्ञान म्हणतात. या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची संधी कोविडच्या निमित्ताने मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पेट्रोल डिझेलवर पर्याय म्हणून जैविक इंधन तयार झाले आहे. धानाच्या तणसापासून, गहू, तांदूळ, उसाची चिपाडे यापासून इथेनॉलची निर्मिती झाली. इथेनॉल इंधन म्हणून यशस्वी ठरले आहे. मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी हे पेट्रोल डिझेलसाठी पर्याय निर्माण झाले आहे. यामुळे क्रूड तेलाच्या आयातीवर नियंत्रण येईल, असेही गडकरी यांनी नमूद केले. शंभर लाख कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे मिशन नक्कीच पूर्ण केले जाईल. पायाभूत सुविधांची कामगिरी उत्तम आहे. खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे १९ हजार कोटींची खाद्य तेलाची आयात कमी होईल. सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होणे म्हणजेच आत्मनिर्भर भारत होय, असेही गडकरी यांनी अधोरेखित केले. |