एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा दाबला
नागपूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने २३ वर्षीय गळा दाबून तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नवीन कामठी येथे मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी प्राणघातक हल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.
निखिल प्रकाश वानखेडे (रा. गंगापूर, उमरेड) हे अटकेतील युवकाचे नाव आहे. पीडित तरुणी परिचारिकेच्या अभ्यासक्रमाला आहे. ती निखिलला ओळखते. निखिल तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. तरुणीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे तो संतापला. मंगळवारी सकाळी निखिल तरुणीच्या घरात शिरला. संतप्त निखिलने तिचा गळा दाबला. तिला मारहाण केली व फरार झाला. शेजाऱ्यांनी नवीन कामठी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शोध घेऊन निखिलला अटक केली.