सणासुदीच्या काळात कांदा शंभरी पार.
onions-cross-rs-100-during-the-festive-season-
* घाऊक बाजारात मात्र ६० रुपये दर * बटाटाही किरकोळ बाजारात ६० रुपयांवर
नागपूर : ठोक बाजारात कांद्याचे दर ६० रुपये किलो असले तरी शहरात किरकोळ बाजारात लाल कांद्याचे भाव १२० रुपये प्रति किलो गेले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामन्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. बटाटाही किरकोळ बाजारात ६० रुपयांवर पोहचला आहे.
भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणारा कांद्याचे भाव तेजीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज २० ट्रक आवक होत असते.हा कांदा नगर,नाशिक ,बुलढाणा येथून काही प्रमाणात येतो तर जिल्ह्यतून पांढरा कांदा येतो. मात्र परतीच्या पावसामुळे नाशिक, बुलढाणा येथील काही प्रमाणात कांद्याचे पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे आवक थोडी कमी झाली आहे. परंतु सध्या आंध्रप्रदेश, धुळे आणि कर्नाटकावरुन नव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. असे असले तरी मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे.त्यामुळे ठोक बाजारात कांद्याच्या भावात दर वाढ झाली असून चांगल्या दर्जाचा कांदा ६० रुपये किलो विकला जात आहे. मात्र किरकोळ बाजारात मिळणारा कांदा शंभरच्या पार गेला आहे. किरकोळ विक्रेते नाशिकच्या बाजारपेठात गेल्या तीन दिवसांपासून लिलाव बंद असल्याने भाव वाढल्याचे सांगत आहेत. परंतु ठोक व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याचा आणि लिलाव बंदचा काही संबंध नाही.येणारा कांदा हा लिलाव बंदीच्या पूर्वी खरेदी केलेला आहे. त्यामुळे भाव वाढीचे काही संकेत नसताना किरकोळ बाजारात भाव का वाढले, या संभ्रमात ठोक व्यापारी पडले आहे. पुढील काही दिवसात नव्या कांद्याची आवक वाढताच कांद्याचे दर ठोक भावात ४० रुपये किलो होतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
बटाटय़ाची आवक कमी
सध्या बाजार समितीमध्ये बटाटय़ाची आवक कमी झाली आहे. दक्षिण भारतात पीक तेजीत असताना आलेल्या पावसामुळे नवा बटाटा पाण्यात गेला आणि त्यामुळे राज्यात आवक कमी झाली. गतवर्षी बटाटय़ाचे उत्पादन अधिक झाल्याने भाव घसरले होते. त्यामुळे यंदा राज्यात उत्पादन कमी घेण्यात आल्याने बटाटा कमी येत आहे. बाजार समितीमध्ये ठोक भावात बटाटा ३० रुपये किलो असून किरकोळमध्ये पन्नास ते साठ रुपयांवर गेला आहे.