फ्लॅटमध्ये चालत होते ऑनलाईन सेक्स रॅकेट
नागपूर : अमरावती मार्गावरील भरतनगरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन देहव्यापाराचा हायप्रोफाईल अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून हरियाणा, हैदराबाद येथील दोन दलालांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका केली आहे. आरोपींमध्ये कृष्णकुमार देशराज वर्मा (२४, रा. हिसार, हरियाणा) व मो. मोबिन मो. ख्वाजा (२३, रा. हैदराबाद) यांचा समावेश आहे. आरोपी बऱ्याच काळापासून देहव्यापाराशी संबंधित आहेत. ते नागपुरात ऑनलाईन देहव्यापार चालवित होते. त्यांनी १५ दिवसांपूर्वी भरतनगरातील पुराणिक लेआऊटमध्ये स्वामी संकेत अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. येथे पीडित तरुणींच्या मदतीने देहव्यापार सुरू केला होता. इंटरनेटवर साईट बनवून ते ग्राहकांशी संपर्क साधत होते. ही बाब गुन्हे शाखेला कळली. तेव्हा डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला गेला. आरोपींनी ७ हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. आरोपींनी पैसे स्वीकारताच पोलिसांनी छापा मारून आरोपींना बेड्या ठोकल्या. अड्ड्यावर तीन तरुणी होत्या. पैशाच्या आमिषापोटी त्या देहव्यापारात आल्या होत्या. पोलिसांनी आरोपींच्या कारसह ५.७५ लाख रुपयांचा माल जप्त केला. पीडित तरुणी हरियाणा येथील फरिदाबादच्या आहेत. वर्माने इंटरनेटवर नोकरीस इच्छुक तरुणींसाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने तरुणीने वर्माशी संपर्क केला होता. वर्माने त्यांना दर महिन्याला एक लाख रुपये कमाविण्याचे आमिष दिले होते.
त्यासाठी तिने आपल्या अन्य दोन मैत्रिणींनाही तयार केले. वर्माने तरुणींना प्रत्येक ग्राहकाच्या मागे तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत या तरुणी ५ फेब्रुवारीला नागुपरात आल्या. आरोपी रोज त्यांना पाच ते सहा ग्राहक देत होते आणि प्रत्येक ग्राहकापोटी तीन ऐवजी एक हजार रुपयेच देत होते. वर्मा व मोबिन जुने मित्र आहेत. त्यांच्या विरोधात अन्य शहरांमध्येही प्रकरणांची नोंद असल्याची शंका आहे. त्यांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार निरोधक कायदा (पिटा) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय सार्थक नेहेते व त्यांच्या चमूने केली.