5 फेब्रुवारीपर्यंत स्वस्तात सोने खरेदीची संधी; किंमत 50 हजारापेक्षा कमी
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्याची झळाळी कमी झाली आहे. सोने सध्या त्याच्या उच्चांकी दरापासून सात हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचा फायदा घेण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी सरकारने ग्राहकांना सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेद्वारे दिली आहे. सध्या सराफा बाजारात सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत.
या आर्थिक वर्षातील 11 वी सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना सरकारने 1 फेब्रुवारीला जारी केली असून 5 फेब्रुवारीपर्यंत या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेत आरबीआयने 4,912 रुपये प्रतिग्रॅम सोन्याचे दर निश्चित केले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात आलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी 5,104 रुपये प्रतिग्रॅमसाठी किंमती निश्चित करण्यात आल्या होत्या.
दरवेळेच्या योजनेप्रमाणे या योजनेतही ऑनलाईन बाॉन्ड खरेदी करणाऱ्यांना किंमतीवर 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. ऑनलाईनद्वारे सोने खरेदी केल्यास 4862 रुपयांना प्रतिग्रॅमने सोने मिळणार आहे. या सरकारी गोल्ड बॉन्डची किंमत बाजारातील सोन्याच्या दरापेक्षा कमी असते. सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत आरबीआयकडून निश्चित करण्यात येते. या योजनेत कमीतकमी एक ग्रॅम आणि जास्तीतजास्त चार किलोपर्यंत सोने खरेदी करता येते. त्यात करातही सूट मिळते. तसेच या योजनेवर बँकेकडून कर्जही घेता येते.
सॉवरेन गोल्ड बॉन्डवर वर्षाला अडीच टक्के रिटर्न मिळणार आहे. या बॉन्डमध्ये फसवणूक आणि अशुद्ध सोन्याची शक्यता नसते. हे बॉन्ड आठ वर्षांनी मॅच्युअर होणार आहेत. म्हणजेच आठ वर्षानंतर या बॉन्डचे पैशांत रुपातर करून पैसेही घेता येणार आहेत. तसेच पाच वर्षानंतप या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्यायही ग्राहकांसाठी ठेवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आणि सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यावर बॉन्ड विकत घेतलेल्या ग्राहकांनाही फायदा होतो. हे बॉन्ड पेपर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे हे बॉन्ड खरेदी केल्यास ते सांभाळून लॉकरमध्ये ठेवण्याची किंवा सुरक्षित ठेवण्याची जोखीम उचलावी लागत नाही. हे गोल़्ड बॉन्ड पोस्ट ऑफीस, एनएसई आणि बीएसईमध्येही मिळू शकतात.
या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती. बाजारातील सोन्याची मागणी कमी करणे आणि डिजिटल खरेदीला चालना देणे, गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.