‘शाळा बाहेरची शाळा’ हा रेडिओ कार्यक्रम दूर शिक्षणाचा यशस्वी प्रयोग-डॉ. संजीवकुमार

Share This News

आज 100 व्या कार्यक्रमाचे रेडिओ प्रक्षेपण

नागपूर, दि. : कोरोना संक्रमण काळामध्ये दूर शिक्षणाचा एक यशस्वी प्रयोग म्हणून ‘शाळा बाहेरची शाळा’ या रेडिओ कार्यक्रमाने आपली ओळख बनविली आहे. उद्या गुरुवारी शंभराव्या भागाचे प्रक्षेपण होत असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

 विद्यार्थ्यांमध्ये किमान मूलभूत क्षमता, वाचन आणि संख्येवरील क्रिया यामध्ये मुलांचा पाया मजबूत व्हावा, या हेतूने मागील दोन वर्षांपासून ‘लर्निंग इंप्रोव्हमेंट प्रोग्रॅम ‘हा कार्यक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन  एकत्रितरित्या राबवित आहेत. कोरोना महामारीच्या काळात  शाळा बंद असल्या तरी मुलांचे  शिकणे चालू राहावे,  या हेतूने  रेडिओ आधारित कार्यक्रम ‘शाळे बाहेरची शाळा ‘ हा कार्यक्रम 1 मे 2020 पासून नागपूर ‘आकाशवाणी’ वरून प्रसारित होत आहे. या रेडिओ आधारित अध्ययन कार्यक्रमाला गावातील गावकरी, सरपंच विद्यार्थी व त्यांचे पालक, अंगणवाडीताई, शिक्षक, मुख्याध्यापक यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून या आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर व त्यांच्या पथकाचे त्यांनी कौतुक केले आहे.

या कार्यक्रमाचा 100 वा भाग दिनांक 4 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 10.30 ला प्रसारित होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक, स्वयंसेवक, गावकरी, सरपंच, शिक्षण विभागातील अधिकारी, ग्रामीण विकास  विभागातील अधिकारी, महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. विभागातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला केलेले सहकार्य लक्षणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. माधव चव्हाण, रुख्मीणी बॅनर्जी, सुनिल निकम, उषा राणे, स्मितीन ब्रीद, आर.जे. रेशमा, सोमराज गिरडकर, पंकज धुमाळे, विपुल चौधरी, चंद्रशेखर पवार, सुधीर कोटांगळे, रसिका रेवाळे, मधुलिका निरुळकर, मीरा तेंदुलकर, प्रमोद वानखेडे  यांनी प्रयत्न केले आहे. नागपूर विभागात अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग या ठिकाणी होत आहे. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रयोगाचे कौतुक केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.