सदर येथील कोविड सेंटरवर ऑक्सिजनची गळती; नाशिकची पुनरावृत्ती टळली

Share This News

 नागपूर
सदर येथील राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरवर ऑक्सिजनची गळती सुरू झाली होती. सिलेंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे पथक तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व खाटांची कमतरता यामुळे राजभवनाच्या बाजूला आयुष हॉस्पिटलमध्ये नुकतेच हे कोविड सेंटर सुरू केले आहे. आजच्या घडीला येथे ४५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. २२ एप्रिल रोजी दुपारी ४.३0 च्या सुमारास ऑक्सिजनचा सर्वत्र गंध पसरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकात कुजबुज सुरू झाली. त्यानंतर काही रुग्णांना प्राणवायू सुरळीत मिळत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. नुकत्याच झालेल्या नाशिकच्या दुर्घटनेमुळे भयभीत झालेले रुग्ण, नातेवाईक व प्रशासन यांची तारांबळ उडाली. ऑक्सिजन गळती सुरूझाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे ती प्रशासनाच्या कानावरही गेली. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे एक पथक, अग्निशमन दल तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला ऑक्सिजन सिलेंडर मधील मुख्य कॉक बिघडल्याने वायुगळती सुरू झाल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच या बिघाडाची दुरुस्ती केली आणि ऑक्सिजन प्रणाली सुरळीत केली.
खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधील सर्व सिलेंडरची तपासणी करून ते व्यवस्थित आहेत की नाही, त्याचीही पाहणी करण्यात आली. नाशिकच्या घटनेमुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे.या रुग्णालयातून रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात अँम्बुलन्सही बोलवण्यात आल्या होत्या. मात्र ऑक्सिजन प्रणाली सुरळीत केल्याने वातावरण निवळले व रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांना इतरत्र हलविण्याचा निर्णय मागे घेतला.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.