ओझलेम आणि उगुर

Share This News

तुर्कस्तानातून एक माणूस जर्मनीत येतो…फोर्ड कंपनी मध्ये कामगार म्हणून राहतो… आणि त्याचा मुलगा आणि सून या दोघांनाही जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मर्केल या आदराने एक वैशिष्ट्यपूर्ण भेट देतात !!
कोणती भेट ही आहे बरे?
अँजेला मर्केल यांनी या दोघाही पती-पत्नींना पुढे करून स्वतः त्यांच्यामागे त्या चालत स्टेजवर गेल्या आणि संपूर्ण जगाचे प्राण वाचविणाऱ्या या पती-पत्नींना मानाचा मुजरा केला…
का केला असेल हा मुजरा?
तुर्कस्तान मधून निर्वासित म्हणून जर्मनीत आलेल्या या कामगाराच्या या मुलाचे नाव आहे, उगूर साहीन आणि त्याच्या सुनेचे नाव आहे, ओझलेम तुर्की !
दोघांना “ऑर्डर ऑफ मेरीट” हा सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आला कारण या दोघांनी शोध लावला आहे…कोरोनावर मात करणाऱ्या व्हॅक्सिनचा. लसीचा. तुर्कस्तानातून जर्मनीत घुसलेले हे घुसखोर आहेत म्हणून तेथील धर्मवादी-राष्ट्रवादी आणि धर्मराष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांनी जोरदार विरोध तुर्कस्तानातून जर्मनीत निर्वासित झालेल्या लोकांना केलेला होता.
“उगुर साहीन आणि त्याचे बाबा आमच्या जर्मनीत राहिले आणि त्यांनी कोव्हिड लसीचा शोध लावला याचा आम्हाला अभिमान आहे” असे जर्मनीच्या लोकशाही पक्षाचे अध्यक्ष लाचॅट यांनी कौतुकाने म्हटले आहे. जर्मनीत आलेल्या निर्वासित वर हल्ले करणाऱ्या धर्मराष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांची त्यांनी यावेळी निर्भत्सना केली.
चार वर्षाचा असताना ऊगुर साहिन जर्मनीत आला होता. लहानपणापासून विज्ञानाची पुस्तके वाचण्याचे त्याला वेड होते आणि जर्मनीतल्या कोलोन विद्यापिठात त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर कॅन्सरवर संशोधन करण्याचा त्याने सपाटा लावला. आज तो जर्मनीतला आणि जगातला देखील कॅन्सरवर उपचार शोधण्यासाठी नंबर एकचा वैज्ञानिक समजला जातो. विद्यापीठात असताना त्याला भेटली तूर्कस्तानतूनच आलेली ओझलेम तुर्की. इस्तांबुल मधून जर्मनीत निर्वासित म्हणून आलेल्या डॉक्टर बापाची ओझलेम वैद्यकीय शिक्षणासाठी याच विद्यापीठात होती. दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केलं. ओझलेम हीसुद्धा कॅन्सरवर अफाट संशोधन करणाऱ्यांपैकी एक वैज्ञानिक आहे. तिने व उगूर ने हजारो वैद्यकीय प्रबंध लिहिले आहेत आणि त्यातले बहुसंख्य हे आर एन ए या आपल्या गुणसूत्रावर आधारलेले आहेत. दिवसरात्र दोघांनी मेहनत करून आर एन ए चे काने आणि कोपरे खोदून काढले आहेत. दोघेही म्हणूनच आर एन ए च्या संशोधनातील बाप माणसं समजली जातात. बर्लिनमध्ये दोन वर्षापूर्वी संसर्गजन्य रोगांविषयी एक परिषद आयोजित केली होती. त्यावेळी उगुर साहीन म्हणाले होते, एम आर एन ए च्या साह्याने अनेक संसर्गजन्य रोगांवर आपणास लस बनवता येऊ शकते. त्याचे हे म्हणणे कोरोना येण्यापूर्वीचे होते. कोरोना आल्यानंतर दोघांनी मिळून प्रचंड मेहनत आणि संशोधन करून कोरोनावर मात करणारी जगातील पहिली लस तयार केली. डॉक्टर उगुर साहीन आणि ओझलेम तुर्की यांनी बायोएन टेक कंपनी चालविली होती ज्यामध्ये कॅन्सरवर लस शोधून काढण्याचे संशोधन सुरू आहे. दोघांचेही म्हणणे आहे की आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीने कॅन्सरला मारता येऊ शकेल. फायझर या कंपनीने बायोटेक बरोबर एकत्र येऊन कोविड वरील लस आज जगाला प्रदान केली आहे. फायझर कंपनीचे अल्बर्ट बरुला हे देखील ग्रीक मधून निर्वासित म्हणून आलेले आहेत. आपल्या देशात घुसखोरांच्यासाठी कायदे करण्यासाठी तथाकथित राष्ट्रवाद्यांनी चालवलेला सरकारी उद्योग आणि जर्मनीने घालून दिलेले उदाहरण यात केवढे मोठे अंतर आहे !! उगुर आणि ओझलेम दोघांनी मिळून गेली वीस वर्षे एम आर एन ए या गुणसूत्रांवर अभ्यास करून माहिती गोळा करण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत… शेकडो वेळा त्यांनी विविध प्रयोग केले आहेत…. त्यांना रोग प्रतिकार विज्ञानाचे तज्ञ समजले जाते. म्हणूनच कोव्हिड वर लस शोधून काढणे त्यांना साधता आले. या उपक्रमाला त्यांनी नाव दिले होते “प्रोजेक्ट लाईट स्पीड”. दोघांनी मिळून जैववैद्यकीय कंपन्या काढल्या आणि त्या विकल्या देखील. आज जर्मनीतील 100 श्रीमंत लोकांच्या यादीत हे वैज्ञानिक जोडपे आहे. विज्ञान, विज्ञान आणि विज्ञान हाच दोघांचाही ध्यास आहे. दोघांनीही चार चाकी गाडी घेतलेली नाही. दोघेही सायकलवरून प्रवास करतात. आणि त्यांना वायफळ वेळ दवडलेला अजिबात आवडत नाही. त्यांचा संपूर्ण वेळ संशोधनात आणि वैज्ञानिक प्रयोग शाळेत जातो. पैसा कमविणे व त्यासाठी वेळ घालविणे हे उगुरला तर अजिबात आवडत नाही.
एखाद्या राजकारण्यांनी व सरकारने वैज्ञानिकांना अशा पद्धतीने मानसन्मान दिलाय..जे दुर्मिळ आहे..त्याबद्दल जर्मनी मधील सरकारचे अभिनंदन. हिटलरी तत्वज्ञानाचा पुरस्कार करणार्या धर्मवाद्यांना हिटलरच्याच देशातील हा बदल चांगलेच चपराक लगावणारा आहे!
आमच्या देशात बुवा महाराज कोरोनावर औषध आणतात आणि सरकार त्यांचा सत्कार करते आणि वैज्ञानिकांना मात्र कुठल्यातरी कोपऱ्यात ढकलून देते. हे औषध कोणतीही चाचणी न घेता बाजारात आणले जाते आणि या औषधाचा निर्माता असलेला बुवा-महाराज धडधडीत खोटे सांगतो की हे औषध जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केले आहे. त्यावर करोडो रुपयांची पोळी भाजून घेतो.
वैज्ञानिक बनणे एवढे सोपे नसते. दाढ्या वाढवून तर अजिबातच वैज्ञानिक होता येत नाही. आमच्या पुर्वजांनी पुर्वीच शोध लावलाय असले फालतू बोल तर विज्ञान कोलते. जगातल्या साऱ्यांचे प्राण वाचवण्याचा सातत्याने प्रयोग विज्ञानाने केला आहे आणि करीत राहील.
आज आपण जी लस घेतोय त्याचा शोध लावलेल्या उगुर आणि ओझलेम या वैज्ञानिक जोडप्याने जगासमोर एक मोठे उदाहरण ठेवले आहे की मानव कल्याण धर्मातून नव्हे तर विज्ञानातून होते !!
आणि बायोटेक सारखे संशोधन केंद्रे हीच मशिदी – मंदिर – चर्चेस होत.

  • डाॅ. प्रदीप पाटील
    Pradeep Patil

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.