कोरोनावरील लसीच्या वितरणासाठी नियोजन सुरू

Share This News

लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. लस आल्यानंतर ती वितरित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ही लस वितरित करणे, आता आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने तयार राहा. सूक्ष्मनियोजन करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. दरम्यान, त्यांनी खाजगी रुग्णालयांना, डॉक्टरांना त्यांच्याकडे कार्यरत आरोग्य सेवकांची माहिती लवकरात लवकर मनपाला सादर करण्याचे आवाहन केले आहे.
कोविड काळात आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या दरम्यान कितीही कठीण काळ आला तरी मनपाच्या आरोग्य यंत्रणेने धिराने त्याला तोंड दिले. कोरोनावरील लस लवकरच येणार आहे. ही लस महाग असल्याने आणि सुरुवातीला पुरवठा कमी होणार असल्याने केंद्र स्तरावर त्याची प्राथमिकता निश्‍चित करण्यात येत आहे. ही प्राथमिकता निश्‍चित होत असताना त्यादृष्टीने आपल्या शहरातील डेटा बेस तयार करणे महत्त्वाचे आहे. शासकीय रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालये, डॉक्टरांची यादी, ज्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे अशा रुग्णांची यादी तयार करण्याचे कामे आता आरोग्य यंत्रणेकडे आहे. लसीचा साठा करण्यासाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोरेज हे सुद्धा मोठे आव्हान आहे. यासाठी सूक्ष्मनियोजन करणे गरजेचे आहे. नागपुरात दोन मोठे मेडिकल कॉलेज, एम्ससारखी संस्था असली तरी दुर्दैवाने महापालिकेकडे असे मोठे मेडिकल कॉलेज नाही. लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नसले तरी उपलब्ध व्यवस्थेत संपूर्ण सेवा अखेरच्या व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फूट सोल्जर’ तयार करणे, हे सुद्धा सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपुढे आव्हान असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसलेनगर भवन येथे आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी बुधवारी (ता. ९) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात आयुक्तांनी मार्गदर्शन केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.