कृषी कायद्यांवर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांसाठी पर्याय वाढणार, तंत्रज्ञानाशी जुळणार’
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा शेतकरी कायद्याचं समर्थन करत शेतकऱ्यांच्या फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांना पर्याय वाढणार आहेत. तसेच शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज फिक्कीच्या 93व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण 20-20 सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिलं आहे. 2020 वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोनाकाळाबाबत विचार करु त्यावेळी आपल्यालाही विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत. मात्र चांगली गोष्ट ही आहे की, जेवढ्या वेगाने परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगाने स्थिती सुधारत देखील आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांमुळं शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. यामुळं देशात कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होणार आहे. यामुळं कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे, असं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात भारताने आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले. देशाचं उदाहरण देशासह जग पाहात आहे. भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जे काम केलं आहे. धोरणं आखली आहेत, निर्णय घेतले आहेत, परिस्थिती सावरली आहे, हे पाहून जग आश्चर्यचकित झालं आहे, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील सहा वर्षात भारतीयांनी असं सरकार पाहिलं जे फक्त आणि फक्त देशातील 130 कोटी जनतेसाठी समर्पित आहे. हे सरकार देशवासियांना प्रत्येक ठिकाणी पुढं नेण्याचं काम करत आहे, असं ते म्हणाले. जगाचा जो विश्वास भारतानं मागील सहा वर्षात जिंकला आहे, तो मागील काही महिन्यात आणखी मजबूत झाला आहे. विदेशी गुंतवणुकीचा विक्रम भारतात केला आहे, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरही तोडगा निघालेला नाही. आज आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक झाले असून जयपूर आणि आग्रा हायवे जाम करणार असल्याचा इशारा दिला आहे.