महापालिका आयुक्तांचे आदेश; बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रणाची तयारी

Share This News

नागपूर : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याने करोनाचा धोकाही वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने काही बाजारपेठांना ‘वाहनमुक्त क्षेत्र’ करणे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दुकानदार आणि ग्राहक यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी सोमवारी दिले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी  सीताबर्डी बाजारपेठेत रविवारी झालेल्या गर्दीमुळे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तातडीने आज बैठक बोलावली. या बैठीकाला महापालिका आणि पोलीस अधिकारी यांच्यासह व्यापारी, दुकानदारांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

पोलीस बंदोबस्त, महापालिका अधिकाऱ्यांना बाजारपेठवर नजर ठेवण्याची जबाबदारी तसेच दंडात्मक कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात  राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र दिले आहे.

सीताबर्डी, गांधीबाग,  इतवारी, महाल, गोकुळपेठ, जरीपटका आणि इतर बाजारपेठेत नागरिकांची  होणारी  गर्दी  ही  करोनाचा  प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. राज्य शासनाने तसेच नागपूर महापालिकेच्या वतीने नागरिकांना त्रिस्तरीय मुखपट्टीचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, बंधनकारक केले आहे. तरीसुद्धा आदेशाचे गांभीर्याने पालन होत नसल्याने  आयुक्तांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुकानदाराने पहिल्यांदाच  निर्देशाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा निर्देशाचे उल्लंघन केल्यास  आठ  हजार रुपये आणि तिसऱ्यांदा निर्देशाचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. या दंडात्मक तरतुदीव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार नियमभंग करणारे सर्व संबंधित दुकानदार, आस्थापना मालक हे फौजदारी गुन्हा दाखल करणे तसेच परवाना रद्द करणे किंवा दुकान बंद करणे यासारख्या कारवाईस पात्र राहतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.