पूजाच्या आजीचा गौप्यस्फोट; संजय राठोडांनी पुजाच्या आईवडिलांना पोहोचवले पाच कोटी रुपये |Pooja’s grandmother’s assassination; Sanjay Rathore handed over Rs 5 crore to Puja’s parents

Share This News

पुणे : राज्यात सध्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन वादंग उठले असून आज 19 दिवस या घटनेला उलटून गेले आहेत. या प्रकरणात काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. आता या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणात काल गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही.

शांताबाई म्हणाल्या की, पैशांसमोर स्वतःच्या मुलीची ज्या आई-वडिलांना किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? समाजाची दिशाभूल तर पूजाच्या आईवडिलांनी केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केल्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याबाहेर काल माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत ही नोटीस बजावली आहे.

या नोटिशीमध्ये तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल, असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

काल बोलताना शांताबाई यांनी म्हटले होते की, 18 दिवस पूजाच्या मृत्यूला झालेले आहेत. कुणीही नातेवाईक पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्याने आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत.

गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत पुण्यातून बाहेर मी जाणार नसल्याचे पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितले. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार असल्याचेही शांताताई चव्हाण यांनी सांगितले होते. शांताताई म्हणाल्या होत्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नसल्याचेही शांताताईंनी म्हटले होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.