रूपेरी- चंदेरी
प्रभाकर पणशीकरांची याद…
तो खिलाडू वृत्तीचा आणि जुलजार दिसणारा माणूस होता. जगण्याला जेवढा भिडला तेवढाच तो मृत्यूसमोर देखील ताकदीने उभा राहिला. मी एक दिवस नसणार्यात जमा होणार आहे त्यामुळे आयुष्याला फेसाळणारा प्याला मी प्यायला पाहिजे अन् संपल्यावर मीच तो संपविला असल्याने त्याचे दु:ख करण्याचे किंवा भीती बाळगण्याचे काही कारण नाही, असे मानणारे पंत भरभरुन जगले, त्यांच्याकडे जे जे आहे ते देत जगले अन् मग आता जगायचं थांबले आहेत. महाराष्ट्राची ही ‘नाट्यसंपदा’ आता विसावली आहे.
नाटक घेऊनच हा माणूस जन्माला आला होता. काही माणसांच्या जन्माचे प्रयोजन असते. अवतार असल्यागत काही जीवांचा जंम होत असतो. पणशीकर त्यातलेच एक. नाटकासाठीच या माणसाचा जन्म झाला होता. गंमत म्हणजे नाटकाचा बंगला नावाच्या वास्तूत झाला. वेदशास्त्रसंपन्न घरातला मुलगा चक्क नाटुकला होतो म्हणजे काय? आर्थिकस्थिती चांगली नसली तर काय झाले? घराण्याचा काही लौकिक आहे की नाही? अशाच अविर्भावात घरच्यांनी पंतांना घराबाहेर केले अन् जिद्दी पंतांनी देखील मग रंगभूमीलाच आपले घर केले. त्यासाठी कष्ट झेलले. दिगंत कीर्तीच्या मोठ्या व्यक्तींच्या आयुष्याला सोन्याची झळाळी येण्यासाठी जो काय संघर्ष, अपमान अन् कष्ट करावे लागतात ते सगळे पंतांच्या वाट्याला देखील अलबत आले. हे असं घडणारच, ही संहिता वरच्याने आधीच लिहून ठेवली आहे आपल्याला प्रभाकर पणशीकर ही भूमिका नीट पार पाडायाची आहे, इतक्या आयुष्याच्या समजुतीनं पणशीकर वावरत गेले. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन मध्य पडेल ती कामं करण्यापासून ‘तो मी नव्हेच’ मधला लखोबा लोखंडे पर्यंतचा त्यांचा प्रवास इतक्या निगुतीनं केलेला आहे. ‘तो मी नव्हेच’ नंतर प्रभाकर पणशीकर प्रकट झाले. घोर तपश्चर्येनंतर एखादा महान माणूस प्रकट वगैरे होतो अगदी तसे प्रकट झाले. ‘हा तोच का? कपडेपटात काम करणारा?’ ‘तोच का? अडनड निभवायला एखादी चिल्लर भूमिका करणारा?’ ‘होच का हा, रांगणेकरांचा मॅनेजर?’ आश्चर्यानं लोक विचारत राहिले अन् पंत सांगत राहिले, “तो मी नव्हेच!” आयुष्यात यशाचं श्रेय घ्यायला लोक हिररीने समोर धावतात आणि अपयशाचं खापर दुसर्यांवर फोडतात. पण, पणशीकरांनी यशाच्या वेळी तो मी नव्हेच ची भूमिका घेतली आणि मग आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षणात सांगून टाकले
‘तोच
मी’
‘तो मी नव्हेच’ मधल्या पंचरंगी भूमिका ही पणशीकरांची ओळख झाली. नटसम्राट मधला आप्पासाहेब बेलवलकर साकारण्याची अनेकांची इच्छा असते तशीच पणशीकरांचा लखोबा लोखंडे उभा करावा काय आपणही, असा अनेकजण विचार करत असतील मात्र कुणी त्या भूमिकेला हात लावू शकले नाही. हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीची अन् रसिकांचीही ऑलटाईम गरज झाले आहे. म्हणून पंतांनी हा शेवटचा हा शेवटाच असे म्हणत अनेक प्रयोग केल्यावर तब्बल 3000 हजार प्रयोग केल्यावरही ते नाटक रसिकांना हवेच होते म्हणून डॉ. गिरीश ओक यांच्या खांद्यावर ती धुरा टाकण्यात आली. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीची स्वत:ची अशी खास शैली आणि देखणेपणा या पणशीकरांच्या जमेच्या बाजु होत्या. ते एक चांगले आयोजक होते. नियोजनबद्धता आणि शिस्त होती. अभिनेता होऊनच नाटक जगता येतं असं नाही. नाटक सर्वच अंगानं जगलन पाहिजे म्हणून पणशीकरांनी नाट्यसंपदा नावाची नाटकाची कंपनी काढली. मोहन वाघ त्यांच्या सोबत होते. सुरुवातीची तिनही नाटकं त्यांची पडली. असल्या पडझडीची त्यांना सवय होती. रांगणेकर- अत्रे भांडणानंतर ते अत्र्यांच्या बाजुने झुकल्यावर रांगणेकरांनी देखील लखोबाच्या भूमिकेसाठी आत्माराम भेंडे यांना घेऊन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. अत्र्यांनी देखील तसलाच प्रयोग करुन पाहिला मात्र पणशीकरांशिवाय ‘तो मी नव्हेच’ हे समीकरण कधीच जुळणारे नव्हते. जिथे थिएटरची सोय नाही, अगदी टुरींग टॉकीजच्या ताप्तुरत्या उभारलेल्या रंगमंचावर प्रयोग करायचा झाला तरी चालेल मात्र नाटक हे माणूस जाणून घेण्याचं अन् माणसांच्या व्यवहाराची मांडणी करणारं माध्यम असल्याने जिथे जिथे माणसं राहातात तिथे तिथे नाटक झालं पाहिजे अशी त्यांची धारणा होती. रंगभूमीचे अविष्करण जिथेकुठे साध्य आहे तिथे जाणार असे ते नागपूरला एका नाटकात काम करायला आले असताना झालेल्या गप्पांदरम्यान बोलले होते. तन्मय या संस्थेच्या, मला काही सांगायचंय, या नाटकात भूमिका करायला ते आले होते. मुंबईचं रेडीमेड नाटक घेऊन गल्ला गोळा करायला आले नव्हते. विदर्भात व्यवसायी नाट्य चळवळ उभी राहावी म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता. उमेदीच्या काळात आपण ज्या क्षेत्रात काम केले ते नव्या उमेदीच्या लोकांकडे सोपवावं असं वाटलं, ‘तन्मय’चा ग्रुप त्या दृष्टीने योग्य वाटला म्हणून आलो, असे पणशीकर म्हणाले होते. पुण्या- मुंबईचे नाटकवाले जिकडे जायला नाके मुरडतात त्या अगदी पांढरकवडा, मोर्शी, चिमुर सारख्या ठिकाणी देखील त्याननी ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग केले आहेत. क्लास अन् मासची नाटकं असं काही नसतं. नाटक चांगलं असल तर ते कुणालाही कळतं अन् रीझवतं देखील, ही भूमिका घेऊनच त्यांनी त्यांच्या नाटकांची निवड केली. मराठी रंगभूमीला त्यांनी शैलीदार अभिनयाची देणगीच दिली. त्यांच्या संवादफेकीची नक्कल मारण्याचा नंतरच्या काळात अनेकांनी प्रयत्न केला मात्र किशोर कुमारचे गाणे दुसर्याला गाता येते गुलाम आलीच्या गज़लची नक्कल करता येत नाही. पणशीकरांच्या भूमिका अशा वनपीस होत्या. सेकंहँड भूमिका त्यांनी कधी केल्या नाहीत अन् त्यांच्या भूमिका देखील दुसर्या कुणाला सेकंडहँड म्हणून करता आलेल्या नाहीत. लखोबा, प्रोफेसर विद्याधर आणि औरंगजेब या त्यांनी साकारलेल्या भूमिका खास त्यांच्या छापाच्या झाल्या. याच भूमिकात ते अडकले अशी टीका देखील त्यांच्यावर झाली. पु. बा. भाव्यांच्या ‘महाराणी पद्मीनी’ या नाटकात त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी साकारला. औरंगजेबाचा बाज वेगळा होता, खिलजी त्यांनी वेगळा उभा केला होता पण तरीही खिलजी मोजला गेला तो औरंगजेबातच. पंतांनी वेगळे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही. नटसम्राटच्या वाट्याला जाण्याचा मोह त्यांनी देखील आवरता आला नाहीच पण रसिकांनी ‘लखोबा’ला ‘नटसम्राट’ म्हणून स्वीकारले नाही. नाट्यसंपदा या संस्थेच्या मार्फत त्यांनी नाटक या विषयावर अनेक प्रयोग केले. नाटकांच्या चळवळीत देखील ते होते.
‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकापासून ते ‘अवघा रंग एकची झाला’ पर्यंत नाट्यसंपदा चा प्रवास मराठी रंगभूमीला बरेचकाही देऊन
जाणारा आहे.
पणशीकरांच्या या देखण्या आणि दमदार व्यक्तिमत्त्वाची भुरळ अवघ्या महाराष्ट्राला पडली होती, नव्हे गुजरात, कन्नड पर्यंत तिचा दरवळ होता. महाराष्ट्राबाहेरही आपल्या नाट्यसंस्थेच्या शाखा उघडणारा हा पहीलाच निर्माता होता. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनवेळा भूषविणारे देखील पणशीकर पहीलेच. महाराषञट्र शासनाचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या हयातीतच तो त्यांच्या नावाने देणे सुरू झाले. अता या पुरस्काराची ओळख प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार अशी आहे. आपल्या हयातीतच आपल्या नावाने असली ठेव ठेवलेली पाहण्याचे भाग्य केवळ पणशीकरांच्याच वाट्याला आले. अर्थात हे त्यांनी अत्यंत कष्टाने साध्य केले होते. चित्रपट किंवा दूरचित्रवाणी तूनच कलावंताला ग्लॅमर मिळते असे नाही. त्याचे नाव व्हायला, त्याच्या मागे ग्लॅमर उभे राहायला एखादी सक्षम भूमिका मिळावी लागते. मला लखोबा भेटला नसता तर मी जे आज आहे ते नसतो. लागूंना देखील नटसम्राट भेटला नसता तर ते डॉक्टरी करायला गेले असते… हे क्षेत्रच असे अस्थिरतेचे आहे. क्षणभंगूर आहे. असे ते नागपूरच्या आनंदाश्रम मध्ये जवताना मारलेल्या गप्पात बोलून गेले होते. आपल्या गुणांची आणि न्युनाची नेमकेपणानं जाणीव असणारा हा माणूस होता. म्हणूनच कुठलंच असमाधान त्यांनी कानामागे लेखणी खोचून ठेवावी तसं खोचून ठेवलं नाही. नाटक नावाचा अल्लादीनचा दिवा त्यांच्या हाती सापडला अन् त्यांनी त्या जादुच्या दिव्याचा सन्मार्गी वापर केला. तो दिवा त्यांच्या हाती देणार्या नियतीलाही त्यामुळे सार्थकच वाटले असेल. कंपनी चालवीत असताना अनेक अचडणी आल्या, आर्थिक चणचण तर पाचवीलाच पूजलेली राहिली. अन्मान वाट्याला आले ते सगळ्यांनाच दिसले पण अपमानही आले ते त्यांनी पडलेली नाटकं बाजुला टाकावी तसे बाजुला टाकून दिले. मचहणून अगदी आयुष्याच्या संध्याकाळी देखील ते अत्यंत समाधानी होते. ‘तो मी नव्हेच’ आणि ‘तोच मी’ हे दोन्हीही यथार्थच आहे. यातला ‘तो’ आता नाही, हे वास्तव मात्र पचविता येणारं ना.