मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पुढील २४ तासांसाठी इशारा
मुंबई, १४ : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये पाऊस पडत आहे. पाऊस पडत असल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळपासून उपनगरांमध्ये रिमझिम सुरू आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाऊस सुरू असून पनवेलमध्येदेखील जोरदार सरी कोसळल्या.
पुढच्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. वसई-विरार नालासोपाऱ्यातही सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाच्या सरी सुरूच आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा पसरला आहे. त्यामुळे थंडीचा पारा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.