पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, सर्व व्यवस्था सज्ज

Share This News

नवी दिल्ली

कोरोना विषाणूला हटविण्यासाठी जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ भारतात लवकरच होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारताच्या औषध नियंत्रकांकडून रविवारी दोन लसींना अंतिम अनुमती दिली गेल्यानंतर आज सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण कार्यक्रमासंबंधी प्रतिपादन केल्याने केंद्र सरकारने सर्व सज्जता पूर्ण केल्याचे समजले जात आहे.

अनुमती मिळालेल्या दोन लसींपैकी कोव्हॅक्सिन ही पूर्णतः भारत निर्मित आहे, तर कोव्हीशिल्ड ब्रिटनमध्ये बनविण्यात आली असून भारतात तिचे उत्पादन होणार आहे. एक प्रकारे, या दोन्ही लसी भारत निर्मितच आहेत. या यशासाठी मी सर्व संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे अभिनंदन करतो. आपल्या संशोधकांनी उत्पादनाच्या संख्येप्रमाणेच त्यांच्या गुणवत्तेसंबंधीही दक्षता बाळगणे आवश्यक आहे. जागतिक गुणवत्तेची उत्पादने आपल्या देशात निर्माण झाल्यास आपण आत्मनिर्भर भारताचे ध्येय गाठू शकणार आहोत, अशी मांडणी त्यांनी केली. ते राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत संशोधक आणि तंत्रज्ञांसमोर बोलत होते.

मागणी आणि स्वीकारार्हता

भारतीय उत्पादनांना जगात मागणी तर निर्माण व्हावीच, पण त्यांची स्वीकारार्हताही अधिक असावी. सगळे जग भारतीय उत्पादनांनी भरून जावे, असा आमचा आग्रह नाही. तथापि, जगभरातील ग्राहकांची मने आमच्या उत्पादनांनी जिंकली पाहिजेत. संशोधकांनी तशा प्रकारच्या उत्पादनांवर भर द्यावा. आपले उत्पादक भारतात ज्या गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा देतील त्यावर भारताचे जगातील सामर्थ्य अवलंबून असेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञान आणि उद्योग

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या विकासावर कोणत्याही देशाचा विकास अवलंबून असतो. वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक संशोधनातून तंत्रज्ञान जन्माला येते. तंत्रज्ञानातून उद्योगांचा विकास होतो. नंतर उद्योग विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनात आणखी गुंतवणूक करतात. अशा प्रकारे निर्मिलेल्या सुष्टचक्रामुळे देशाचा आर्थिक विकास होतो. असे सुष्टचक्र आज सर्वाधिक महत्वाचे ठरले असून ते ‘आत्मनिर्भर’ भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रीय अण्विक प्रमाणवेळ राष्ट्रार्पण

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय अण्विक प्रमाणवेळ प्रणालीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली’चेही राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेच्या वास्तूची कोनशीला स्थापित केली. हा सर्व कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला.

महत्वाचा बॉक्स

कोव्हॅक्सिन मुलांसाठीही भारतनिर्मित कोव्हॅक्सिन लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. हा महत्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. ही लस मुलांसाठीही सुरक्षित आहे, हे सुनिश्चित झाल्यानंतरच ही अनुमती देण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. कोव्हॅक्सिनचे 1 कोटी डोसेस सध्या सज्ज ठेवण्यात आले आहेत, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.