एक मराठा कोट मराठा

0

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील

अंतरावली सराटी या जालना जिल्ह्यातील खेड्यात दीड एकर शेती कसणाऱ्या एका पन्नास किलो वजनाच्या अती सामान्य मराठा तरुणाने आज जग जिंकून घेतलं. खुद्द छत्रपतींच्या घराण्यातील अन 96 कुळी धनाढ्य मराठ्यांना आजवर जे जमले नाही ते मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवले आहे.

अडीचशे एकर जागेवरील विराट सभा,तीनशे एकरावर पार्किंग,20 लाखांवर वाहनांचा ताफा,एक कोटी लोकांचे जेवण बनवण्यासाठी धडपड करणारी गोदाकाठची 123 गावे,कोट्यवधी मराठ्यांच्या काहीतरी कामात यावे म्हणून धडपडणारा मराठवाडी मुस्लिम समाज अन राज्यातून या त्सुनामीत हजेरी लावणारा दीड कोटी मराठा हे सगळे अभूतपूर्व होते.
मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करणारी एक कोअर टीम पडद्याआड नियोजन करीत होती,त्यांनी राज्यभर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जी नोंदणी केली तिचा 20 लाखांवर आकडा झाल्यावर ही सभा किती विराट होईल याचा अंदाज मला आला होता. आजच्या विराट सभेने देशातील सगळ्या सभांचे विक्रम मोडीत काढले आहेत. एक मागणी,एक घोषणा अन मंचावर एकच नेता हे आजच्या विश्वविक्रम करणाऱ्या महासभेची खासियत होती.

विदर्भातील अनेक मित्र गाड्या घेऊन या सभेला गेले होते, पण दीड दोन लाख लोक मध्यरात्रीच मैदानावर तळ ठोकून बसले होते, असे दृश्य आजवर केवळ दीक्षाभूमीवर बघायला मिळाले.दुपारी 12 वाजता सभा सुरू होणार होती पण सकाळी 9 पर्यंतच मैदान हाऊसफुल्ल झाले,सकाळी 10 वाजता मी सदानंद खारोडे या तिथे गेलेल्या मित्राला फोन केला पण त्याच्यासह हजारो वाहने ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून होती, तो म्हणाला अजून आम्ही सभा स्थळापासून 15 किमी अंतरावर आहोत, चारही बाजूने 20/25 किमी आधीच रस्ते जॅम झालेत,

जिथवर नजर जाईल तिथवर केवळ माणसांच्या सागर दिसतोय,पंढरीच्या वारीपेक्षाही विराट स्वरूप बघून जाणारा प्रत्येक मराठा धन्य झाला.एकट्या मनोज जरांगे पाटील या प्रामाणिक माणसाच्या समाज निष्ठेवर भरोसा ठेवून कोट्यवधी लोक तहानभूक विसरून चारपाच तास उन्हात बसून राहिले,सरकारला अवदसा आठवली आणि त्याने आमरण उपोषणावर लाठीमार करून अंतरावली सरटी जगाच्या नकाशावर आणली,सरकारला महिन्याची मुदत दिल्यावर जरांगे पाटील दौऱ्यावर निघाले अन चमत्कार झाला,ज्यांच्यात पाहण्यासारखे काहीच नाही,एखादी वावटळ आली तरी उडून जाईल अश्या मनोज जरांगे पाटलाला बघण्यासाठी लाखभर लोक पहाटे तिनला गर्दी करतात हे अविश्वसनीय म्हणावे लागेल पण ते घडले,पुढे तर गावोगाव मराठा तरुण पेटले,कुणी शे दोनशे जेसीबी कडेला ठेवून फुलांचा वर्षाव केला,तेव्हाच 14 ऑक्टोबर ची सभा त्सुनामी असेल याची खात्री मला पटली होती.

काही पत्रपंडितांनी लाखभर लोक आले तरी जरांगे पाटील जिंकले असे अकलेचे तारे तोडले मात्र ज्यांना या प्रश्नांची तीव्रता माहीत होती त्यांना मराठा सागर उसळेळ याची खात्री होती.या माणसाने आज खऱ्या अर्थांने मराठा हृदयावर राज्य करायला सुरुवात केली आहे.एक मराठा कोट मराठा या नव्या काळाच्या छाताडावर कोरलेल्या वज्र मंत्राचा जरांगे पाटील आज जनक जाहला .