जगातील सर्वात मोठी सिरियल किलर राणी, सौंदर्य टिकवण्यासाठी 650 मुलींची हत्या|Queen of the world’s biggest serial killer, killing 650 girls to preserve beauty

Share This News

बुदापेस्ट (हंगेरी) : तुम्ही अनेक  सिरियल किलर्सविषयी ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र, शेकडो मुलींची हत्या करणाऱ्या सिरियल किलर महाराणीविषयी तुम्हाला माहिती आहे का? हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतिहासात अशा एका राणीची नोंद आहे जिने आपलं सौंदर्य टिकावं म्हणून तब्बल 650 मुलींची हत्या केलीय . तिच्या या गुन्ह्यासाठी तिचं नाव Guinness Book of World Records मध्येही नोंदवण्यात आलंय.

एलिझाबेथ बाथरी युरोपातील ‘हंगरी’ देशाची राणी होती. तिने आपलं सौंदर्य कायम राहावं म्हणून शेकडो मुलींच्या हत्या केल्या. या मुलींची हत्या करुन त्यांच्या रक्ताने ही राणी अंघोळ करत. तिला कुणीतरी सौंदर्य कमी होऊ नये म्हणून असं करण्यास सांगितल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे ती केवळ हत्या करत नव्हती तर या मुलींच्या शरीराचे लचके तोडत कातडी काढून विटंबनही करत होती. यात तिला तिच्या 4 नोकरदारांनीही मदत केली. 1590 ते 1610 या काळात या साडे सहाशे हत्या करण्यात आल्या.

सिरियल किलर राणीला फाशीची शिक्षा, मात्र अंमलबजावणी नाही

महाराणी एलिजाबेथ बाथरीवर जेव्हा खटला चालला तेव्हा तिच्यावर जवळपास 650 हत्यांचा आरोप होता. राणीच्या एका महिला नोकराने याचा खुलासा केला. या नोकराचं नाव सुजेन असं होतं. तिच्या दाव्यानुसार, या हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जॅकब स्जिल्वेसी यांना राणीच्या नोंदींमध्येच हा आकडा मिळाला. आरोपी राणी एलिजाबेथ विरोधात अनेक पुरावे होते. त्या आधारावर तिला फाशीची शिक्षा झाली, मात्र या फाशीची अंमलबजावणी मात्र झाली नाही. तिला डिसेंबर 1610 मध्ये तिच्याच अपर हंगेरीतील (आताचा स्लोवाकिया) महालात कैद करण्यात आलं होतं.

राणीविरोधात 300 पेक्षा अधिक साक्षीदार

एलिजाबेथ बाथरीच्या या निर्घृण हत्याकांडाविरोधात 300 जणांनी साक्ष दिली. यात तिच्या हातातून आपला जीव वाचवण्यात यशस्वी झालेल्या मुलींचाही समावेश होता. विशेष म्हणजे या राणीच्या महालाच्या आजूबाजूला अनेक मृतदेह आणि हाडांचे सांगाडे सापडले. यावरुन या गुन्ह्याचं गांभीर्य समोर आलं. हे मृतदेह वाईट पद्धतीने कापण्यात आलेले होते. राणीला अटक करण्यात आलं तेव्हा तिच्या महालात काही मुलींना बंदी बनवल्याचंही उघड झालं.

नोकरीच्या निमित्ताने गावाहून मुलींना बोलावलं जायचं

मुलींची हत्या करण्याआधी ही राणी गावांमधून मुलींना नोकरीचं आमिष दाखवून महालात बोलवायची. यानंतर महालात आलेल्या मुलींना लक्ष्य केलं जायचं. महाराणी एलिजाबेथ बाथरी राजघराण्याची सदस्य होती. तिचं लग्न फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत झालं. त्याने तुर्कीविरोधातील लढाईत विजय मिळवला होता. यानंतर तो ‘नॅशनल हिरो’ ठरला .

या हत्याकांडावर कुणी कारवाई केली?

हंगेरीच्या बादशाहांना एलिजाबेथच्या या कृत्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. तपास अधिकारी एलिजाबेथची चौकशी करण्यासाठी तिच्या महालात पोहचले तेव्हा त्यांना तेथे अनेक मुलींचे सांगाडे मिळाले. तसेच मोठ्या प्रमाणात सोनेही सापडले. 1610 मध्ये एलिजाबेथला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि तिच्या महालातीलच एका खोलीत कैद करण्यात आलं. याच ठिकाणी 4 वर्षांनी म्हणजे 1614 मध्ये तिचा मृत्यू झाला .


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.