महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Share This News

नवी दिल्ली, २५ मार्च : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार ला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले.यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण; त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप; महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली त्याबरोबर जनतेत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकार मुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे. निसर्ग वादळ ; कोरोना संकट सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडी चे राज्य सरकार आहे. महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबत चे निवेदन आज राष्ट्रपतींना रामदास आठवले यांनी दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार करू असे अश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे रामदास आठवले यांनी कळविले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.